Buldhana Crime News: संतापाच्या भरात माणसं काहीही करू लागली आहे. जवळच्याच माणसांच्या हत्या करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातही अशीच हादरवून टाकणारे भयंकर हत्याकांड घडले आहे. रागाच्या भरात मुलाने वडिलांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि ते पूर्णा नदीत फेकून दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
थरकाप उडवणारी ही घटना बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये घडली आहे. तालुक्यात बोडखा नावाचे गाव आहे. येथीलच शिवाजी तेल्हारकर याने ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून वडिलांची हत्या केली.
हत्येची ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडलेली असून, ती १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
मुलाने केली वडिलांची हत्या, सुनेमुळे समोर आले प्रकरण
या प्रकरणी मृतकाची सुन व आरोपीची पत्नी हिनेच पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे नाव रामराव तेल्हारकर (रा. बोडखा) असे असून, आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर याने हे भयानक कृत्य केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, वडिलांनी "तू काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस" असे म्हणत मुलाला हटकले.
त्याचवेळी मुलाने ताटात उष्टे अन्न का ठेवले म्हणून वाद घालायला सुरूवात केली. हा वाद इतका वाढला की मुलाला राग अनावर झाला. संतापलेल्या शिवाजीने कुऱ्हाडीने वडिलांच्या गळ्यावर व शरीरावर वार करून त्यांचा खून केला.
पोत्यात भरले तुकडे आणि नदीत फेकले
शिवाजी वडिलांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. सगळे तुकडे पोत्यात भरले. त्यानंतर हे पोते त्याने पूर्णा नदीमध्ये फेकून दिले.