प्रतिकार करून थ्रेशरला बांधून ठेवल्यानेच थांबला थरार, भालेगावातील तिन्ही कुटुंब भेदरलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 19:15 IST2023-06-24T19:09:20+5:302023-06-24T19:15:48+5:30
काही युवकांनी प्रतिकार करून पोलीस येईपर्यंत त्याला थ्रेशरला बांधून ठेवले. त्यामुळे पुढील थरार थांबल्याची चर्चा आता गावात होत आहे.

प्रतिकार करून थ्रेशरला बांधून ठेवल्यानेच थांबला थरार, भालेगावातील तिन्ही कुटुंब भेदरलेलेच
अनिल गवई
खामगाव: दारूच्या नशेत तर्रर असलेला आरोपी गणेशने झोपेत आठ जणांवर प्राणघातक हल्ला आणि हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. दरम्यान, काही युवकांनी प्रतिकार करून पोलीस येईपर्यंत त्याला थ्रेशरला बांधून ठेवले. त्यामुळे पुढील थरार थांबल्याची चर्चा आता गावात होत आहे.
या प्राणघातक हल्ल्यात संतोष संबारे (२२), सदाशिव एकडे( ६६), तुळसाबाई एकडे (६२), सागर हुरसाड (२६), संजय हुरसाड (४८),सविता शत्रुघ्न संबारे, सुनीता हुरसाड (४७) आणि अनुराधा कोल्हे (२३) असे आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये संतोष शत्रुघ्न संबारे याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर नागपूर येथे तर, सदाशिव एकडे, तुळसाबाई एकडे आणि आणखी तीन जणांवर अकोला तसेच खामगाव येथे उपचार सुरू आहेत. जखमी असलेल्या एकडे आणि संभारे कुटुंबात एकही पुरूष घरी नाही. सदाशिव एकडे यांची सून एकटीच महिला आणि काही लहान मुलं घरी आहेत. त्यामुळे एकडे आणि संभारे कुटुंबियांवर या हल्ल्याने मोठे संकट कोसळले असून या हल्ल्यामुळे एकडे यांच्या स्नुषा अर्चना एकडे चांगल्याच हतबल झाल्या आहेत.
आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
काहीही एक कारण नसताना आरोपी गणेश सीताराम दिवनाले याने गाढ झोपेत असलेल्या आठ जणांवर प्राणघातक हल्ला केला. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलीसांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
हृदयविकारानंतर झाला हल्ला
सदाशिव एकडे( ६६) यांना जेमतेम १५ दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर खामगाव येथे उपचार करण्यात आले. या धक्क्यातून सावरत नाही तोच हा हल्ला झाला.
ठराविक लोकांना केले लक्ष्य
गणेश दिवनाले याने आपल्या कुटुंबातील लक्ष्मण दिवनाले, विशाल दिवनाले, पवन दिवनाले आणि त्याची पत्नी सरला दिवनाले यांचा सोडून संभारे, हुरसाड आणि एकडे कुटुंबातीलच सदस्यांना लक्ष्य केले.
आरोपी कोणत्याही प्रकारचा वेडसर नाही. त्याने ठरवून हे कृत्य केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
सतीश आडे ठाणेदार, पिंपळगावराजा पोलीस स्टेशन.