मेहकर : ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगाव हागणदारीमुक्त व्हावे, गावात स्वच्छता रहावी, नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी शासनाने निर्मल भारत अभियान सुरु केले. परंतु मेहकर तालुक्यात निर्मल भारत अभियानाची दूरवस्था झाली असून या अभियानाचे काम तालुक्यात अतिशय संथ गतीने सुरु आहे. तर गाड्या अभावी गुड मॉर्निंग पथकाचाही खोळंबा झाला आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगावातील कुटूंबाकडे शौचालय असले पाहिजे, त्या शौचालयाचा नियमीत वापर झाला पाहिजे. गावात स्वच्छता असली पाहिजे, संपूर्ण गाव हागणदारीमुक्त होऊन सर्वसामान्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी शासनस्तरावरुन युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. ज्यांचेकडे शौचालय नाही त्यांना कोणताही दाखल मिळणार नाही. तर त्यांना शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. वेळप्रसंगी त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल, असे शासनाचे सक्त निर्देश आहेत. मात्र तालुक्यात हे अभियान संथगतीने सुरु असून सर्वसामान्यांना शौचालयाचे महत्व पटवून देण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन कोणतीच ठोस पावले उचलल्या जात नाहीत किंवा जनजागृती करीता कार्यक्रमही घेतल्या जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.निर्मल भारत अभियान अंतर्गत सन २0१३-१४ मध्ये पंचायत समितीला ३ हजार २५७ शौचालयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मिळालेल्या ३ हजार २५७ उद्दीष्टापैकी १ हजार ४२८ शौचालयाचे उद्दीष्ट पूर्ण झाले होते. तर सन २0१४-१५ मध्ये ३ हजार ५0७ एवढे उद्दीष्ट देण्यात आले. मिळालेल्या ३ हजार ५0७ उद्दीष्टांपैकी ऑगस्ट १४ अखेर केवळ ४५९ शौचालयाचे उद्दीष्ट आतापर्यंत पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात ही योजना यशस्वी व्हावी, सर्व कुटूंबांनी शौचालय बांधकाम पूर्ण करुन त्याचा वापर करावा, यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात १0 हजार रुपये अनुदान सुद्धा देण्यात येते. मात्र तरी ही योजना ग्रामीण भागामध्ये पाहिजे त्या प्रमाणात राबविण्यात येत नसल्याचे तालुक्यात चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे ही योजना अधिक सक्रीय करण्याची गरज व्यक्त होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात निर्मल भारत अभियानाची दूरवस्था
By admin | Updated: September 18, 2014 00:50 IST