एका दिवशी आठ हजार जणांना लस देण्याची यंत्रणेची क्षमता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:01 PM2020-12-12T12:01:55+5:302020-12-12T12:04:07+5:30

Buldhana News यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. 

The system's ability to vaccinate 8,000 people a day! | एका दिवशी आठ हजार जणांना लस देण्याची यंत्रणेची क्षमता!

एका दिवशी आठ हजार जणांना लस देण्याची यंत्रणेची क्षमता!

Next
ठळक मुद्देकोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचे त्यांनी सूचित केले.

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येत्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी लस येण्याची शक्यता असून, एकाच दिवशी आठ हजार नागरिकांना जिल्ह्यात लस देण्याची क्षमता आहे. त्या आनुषंगाने कोविड लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज ठेवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अपर पोलीस अधीक्षक बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते  प्रामुख्याने उपस्थित होते. 
कोविड लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. त्या आनुषंगाने आरोग्य यंत्रणेसह संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. 
तसेच पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचे त्यांनी सूचित केले. लसीकरण मोहिमेत निवडणुकीच्या धर्तीवरच काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही यादृष्टीने पूर्वीपासूनच सज्जता ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लसीकरण मोहिमेत नियमानुसार प्राधान्यक्रम ठरवून कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही याची खात्री यंत्रणांनी करावी. लसीकरण मोहिमेत काही दुष्परिणाम झाल्यास त्यासाठी किट असते. या किटमध्ये औषधे असल्याची खात्री करून घ्यावी. लसीच्या सर्व बाबींचा अभ्यास करून आरोग्य यंत्रणेने तयार रहावे, असे ते म्हणाले.  यासंदर्भातील कामामध्ये कुठलीही कुचराई होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.


आवश्यक खरेदीप्रक्रिया राबवा
लस साठवणुकीसाठी शीत साखळी प्रभावी असण्याची गरज आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिथे लसीकरण करण्यात येणार आहे, अशा ठिकाणी शीत साखळी निर्माण केली जावी. त्यासाठी आवश्यक असलेल्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यात दिरंगाई होणार नाही हे प्राधान्याने पहावे. लसीकरण करतेवेळी नियमानुसार तीन बुथची व्यवस्था असावी तसचे लसीकरण झाल्यानंतर ॲलर्जी, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास निरीक्षणकक्षही जवळच सुसज्ज ठेवले जावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.


लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज
लसीकरणासाठी यंत्रणा पूर्ण सज्ज असून, पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान एका दिवशी आठ हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था व क्षमता आरोग्य विभागाची आहे. तसेच लस आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून आठ दिवसांत लसीकरण सुरू करता येईल, अशी माहिती या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबले आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली.

Web Title: The system's ability to vaccinate 8,000 people a day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.