Sowing cotton on 424 hectors in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात ४२४ हेक्टरवर कपाशीचा पेरा
बुलडाणा जिल्ह्यात ४२४ हेक्टरवर कपाशीचा पेरा

बुलडाणा: जून महिन्याच्या मध्यावरही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपात अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यातच अवर्षणाचा ससेमिरा मागे लागलेल्या शेतकºयांनी पेरण्यासंदर्भात सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्यात ज्या ठिकाणी संरक्षीत सिंचनाची सोय आहे, अशा ठिकाणी ४२४ हेक्टरवर शेतकºयांनी हंगामपूर्व कपाशीची लागवड केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पारंपारिक पद्धतीने या कालावधीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करत होता. मात्र मधल्या काळात बसलेला फटका, शेंद्री बोंड अळीची समस्या पाहता याबाबतही शेतकरी सावध भूमिका घेत आहे. कधी काळी अशा परिस्थितीत जिल्ह्यात १८ हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर शेतकरी साधारणत:  कपाशीचा पेरा ठिबकचा आधार घेत करीत होते. मात्र यंदा हे प्रमाण अवघ्या काही टक्क्यांवर आल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या दोन तालुक्यांच्या पेरणीच्या अहवालावरून  स्पष्ट होत आहे.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात कृषी विभागाने सात लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले असून खरीप हंगामात जमीनीत पुरेशी ओल निर्माण होईल असा पाऊस पडल्याशिवाय शेतकºयांनी पेरणी न करण्याचे आवाहनही कृषी विभागाने तालुकास्तरावर सुरू केलेल्या अभियानातून केले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २५ मे ते आठ जून या कालावधीत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्यात शेतकºयांना अनुषंगीक माहिती देण्यात येऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पेरणी योग्य क्षेत्र हे सात लाख ४८ हजार हेक्टर आहे. पैकी सात लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केलेले आहे.  दरम्यान, असे असले तरी जिल्ह्यातील काही भागात संरक्षीत सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी शेतकºयांनी पूर्व हंगामी कापसाची लागवड ठिबकवर करण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

पूर्वी काही भागात व्हायची धुळ पेरणी
जिल्ह्यात पूर्वी मोताळा, जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा या तालुक्यात मान्सूनपूर्वच धुळ पेरणी केल्या जायची. मात्र अलिकडील काळात निसर्गाच्या लहरीपणाचा दृश्यस्वरुपात शेतकºयांना अनुभव येत असल्याने याबात शेतकºयांनीही सावध भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. परिणामी संरक्षीत सिंचनाची सोय असलेल्या काही मोजक्यात भागात पूर्वहंगामी कपाशीची लागवड ४२४ हेक्टरवर झालेली आहे. त्यामुळे उपलब्ध मर्यादीत स्वरुपातील पाण्याचा महत्तम स्वरुपात वापर करण्याकडे शेतकºयांचा कल असल्याचे दिसते.

२०१४ मध्ये ठिबकचा घेतला होता आधार
पाच वर्षापूर्वी अर्थात २०१४ मध्ये शेतकºयांनी पाऊस लांबल्यामुळे ठिबकचा आधार घेत कपाशीची जवळपास १९ हजार हेक्टरवर पेरणी केली होती. मात्र यंदाची स्थिती काहीशी बिकट असल्याने त्यादृष्टीने शेतकरी तुर्तास धजावत नसल्याचे चित्र आहे.

सुक्ष्म सिंचनाला प्राधान्य
जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाला प्राधान्य देण्यात येत असून वर्तमान स्थितीत शेतकर्यांना जवळपास २४ कोटी ४१ लाख रुपयापर्यंतचे तुषार व ठिबक सिंचनाचे साहित्य पुरविण्यात आलेले आहे. यातून जवळपास साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर सुक्ष्म सिंचनादरे शेतकरी पीके घेऊ शकतील. यंदा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडलाच नाही. मान्सूनपूर्व पावसानेही अल्पशी हजेरी लावलेली आहे. एक जून ते १२ जून दरम्यान अवघा ५.२ मिमी मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात पडला आहे.


Web Title: Sowing cotton on 424 hectors in Buldana district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.