सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी भंडारेंवर ४.५ कोटींची शेती हडपल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:01 IST2025-11-03T17:52:58+5:302025-11-03T18:01:18+5:30
सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांचे ओएसडी : कुटुंबीयांचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी

Social Justice Minister Sanjay Shirsat accuses OSD Bhandare of grabbing land worth 4.5 crores
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल ४.५ कोटी रुपये किमतीच्या १४ एकर शेतीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. डोंगरखंडाळा येथील शेतकरी राहुल तारे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करत संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
राहुल तारे यांच्या नावावर डोंगरखंडाळा शिवारात एकूण २८ एकर वडिलोपार्जित शेती असून, ती २३ वारसदारांमध्ये सामायिक आहे. मात्र, त्यापैकी केवळ आठ वारसदारांनी गुप्तपणे १४ एकर जमीन सुमारे साडेचार कोटी रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. ही जमीन छत्रपती संभाजीनगर येथील महेंद्र राऊत यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात असून, ते ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांचे मावसभाऊ असल्याचा दावा करण्यात आला आहे. सदर व्यवहार १५ जानेवारी २०२५ रोजी झाला. या व्यवहारात दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचा आरोप तारे यांनी केला आहे. तसेच, उर्वरित वारसदारांची कोणतीही संमती न घेता जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दुय्यम निबंधक सागर पवार यांनी प्रकरणाची माहिती असूनही व्यवहार नोंदवला, असेही त्यांनी म्हटले. तारे कुटुंबीयांचा आरोप आहे की, या प्रकरणात स्थानिक प्रशासनानेही संशयास्पद भूमिका घेतली. तत्कालीन मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी हरकती प्रलंबित असतानाही जमीन राऊत यांच्या नावावर नोंदवली, असा आरोपही त्यांनी केला.
भंडारेंच्या दबावाखाली व्यवहार पार पडला
तारे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण व्यवहार ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्या दबावाखालीच पार पडला. त्यामुळे भंडारे यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तारे कुटुंबीयांनी मंत्री संजय शिरसाट यांना भेट देऊन निवेदन सादर करताना भंडारे यांना तत्काळ पदमुक्त करण्याची आणि निष्पक्ष चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली.
"तारे कुटुंबीयांनी आरोप केलेल्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही."
- सिद्धार्थ भंडारे, ओएसडी, मंत्री संजय शिरसाट