शंकर महाराज सुखरूप! ओंकारेश्वर येथे लागला महाराजांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 11:04 AM2018-09-11T11:04:03+5:302018-09-11T11:09:01+5:30

शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज अखेर मंगळवारी सापडले आहेत.

shankar maharaj jagruti ashram khamgaon | शंकर महाराज सुखरूप! ओंकारेश्वर येथे लागला महाराजांचा शोध

शंकर महाराज सुखरूप! ओंकारेश्वर येथे लागला महाराजांचा शोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज अखेर मंगळवारी सापडले आहेत. त्यामुळे महाराजांच्या हजारो अनुयायांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दृष्ट प्रवृत्तीच्या मनस्तापामुळे व्यथीत झालेले शंकर महाराज खामगाव येथील तपोवनातून निघून गेले होते. 

नांदुरा येथून नाशिक येथे जात असल्याचे सांगत, महाराज भगवान महाकालाच्या दर्शनासाठी ओंकारेश्वर येथे निघून गेले होते. रविवारपासून महाराज सापडत नसल्याने चिंतेत असलेल्या भक्तांना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान, गोड बातमी मिळाली. महाराजांच्या शोधात विविध दिशेने रवाना झालेल्या भाविकांच्या पथकापैकी  माजी न.प. उपाध्यक्ष तथा भाजपा पदाधिकारी महेंद्र रोहणकार यांना शंकर महाराज ओंकारेश्वर येथे सापडले. त्यांनी सर्वप्रथम ही बातमी आमदार आकाश फुंडकर यांना कळविली. त्यानंतर इतर भाविकांना महाराज सुखरूप असल्याचा संदेश देण्यात आला. महेंद्र रोहणकार हे महाराजांच्या अनुयायांपैकी एक असून, शंकर महाराजांचे परम भक्त आहेत. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे ते महाराजांच्या सोबत असून, जागृती परिवाराचे ज्येष्ठ सदस्य प्रमोद पाटील आणि भाविक महाराजांना खामगाव येथे आणण्यासाठी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे रवाना झालेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत महाराज खामगावात येण्याची शक्यता आहे.

आमदार आकाश फुंडकरांचे प्रयत्न फळास!

जागृती आश्रमाच्या संपत्तीवरून निर्माण झालेल्या वादामध्ये सुरुवातीपासूनच मध्यस्थी करणाऱ्या आमदार आकाश फुंडकर यांचे प्रयत्न या निमित्ताने फळास आले आहेत. त्यांनी महाराजांच्या शोधार्थ भाजप पदाधिकारी महेंद्र रोहणकार यांना ओंकारश्वरकडे रवाना केले होते. आता आश्रमातील वाद संपुष्टात यावा, आमदार आकाश फुंडकरांनी यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा भाविकांना आहे.

जागृती परिवाराकडून‘लोकमत’चे आभार!

प.पू. शंकरजी महाराज सुखरूप असल्याची गोड बातमी देत, जागृती परिवाराचे प्रमोद पाटील आणि महेंद्र रोहणकार यांनी ‘लोकमत’चे विशेष आभार व्यक्त केले. संतापाच्या भरात महाराज निघून गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम ‘ऑनलाईन’ आवृत्तीत दिले होते. त्यानंतर  सोशल माध्यमावरही महाराजांच्या शोधासंदर्भात पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. 
 

Web Title: shankar maharaj jagruti ashram khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.