गंभीर रुग्णही गृह विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:30 IST2021-04-22T12:29:56+5:302021-04-22T12:30:05+5:30

Serious patients also in home isolation : जिल्ह्यात नेमके किती गंभीर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, याची संख्याही आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.

Serious patients also in home isolation | गंभीर रुग्णही गृह विलगीकरणात

गंभीर रुग्णही गृह विलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांत जागा नसल्याने गृहविलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही गृहविलगीकरणात ठेवले जात आहे. सध्या कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे; परंतु जिल्ह्यात नेमके किती गंभीर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, याची संख्याही आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. बेडअभावी अनेक रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे दिसून येते. 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे
लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येत आहे. याआधी होम क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांचा होता. आता हा कालावधी १७ दिवसांचा करण्यात आला आहे. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे व खाटा मिळण्यास काहीवेळा विलंब होत असल्याने रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येते. नियमित औषध व खबरदारी न घेतल्यामुळे काही रुग्ण गंभीर होण्याचे प्रकारही वाढले आहेत. जिल्ह्यात खाटांची संख्या टप्याटप्याने वाढवणे सुरू ठेवले आहे. मात्र, अतिदक्षता विभागातील खाटा आणि व्हेंटिलेटरवर खाटांची कमतरता भासत आहे. सर्वसामान्य व गरीब रुग्णांना खाटा न मिळाल्यास घरातच उपचार घ्यावे लागत आहेत. उपचार न घेतल्यास त्यांची प्रकृती खालावण्याचा धोका असतो. 


गृहविलगीकरणाची कारणे काय?
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर बहुतांश कोविड केंद्रे बंद करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. त्या तुलनेत खाटा कमी पडू लागल्या. त्यातच लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होऊ लागल्याने गंभीर रुग्णांना खाटा मिळेना झाल्या. त्यामुळे रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज असलेल्या बाधित रुग्णांना खाटा दिल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्णांना घरातच उपचार घ्यावे लागत आहेत. 

Web Title: Serious patients also in home isolation