Robbery at a beer bar in Chikhali city; Liquor worth millions of rupees stolen | चिखली शहरातील बिअर बारवर दरोडा; लाखो रुपयांचा दारूसाठा लंपास

चिखली शहरातील बिअर बारवर दरोडा; लाखो रुपयांचा दारूसाठा लंपास

ठळक मुद्दे विविध कंपनीच्या व विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या लंपास करण्यात आल्या आहेत. लाखो रूपयांच्या मद्याची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश ‘लॉक डाऊन’ आहे. याअंतर्गत मद्यविक्रीची सर्वप्रकारची दुकाने व बियर बार, हॉटेल आदी बंद आहेत. याचाच फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी चिखली शहरातील रायली जीन परिसरातील एका बियर बारवर दरोडा टाकून लाखो रूपयांचे मद्य लंपास केले आहे. ही घटना २६ मार्चच्या सकाळी उघडकीस आली.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जमावबंदीपासून दारूची दुकाने, बार रेस्टॉरंट बंद आहेत. याच कारणांमुळे बंद असलेल्या शहरातील रायली जीन परिसरातील सुयोग बियर बारला चोरट्यांचा फटका बसला आहे. २५ मार्चच्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी या बारवरच हात साफ केला आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून प्रमोद झाल्टे यांचे सुयोग वाईन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट नावाचे हे प्रतिष्ठाण बंद आहे.
या भागात बहुतांश व्यावसायिक प्रतिष्ठाणे असल्याने सर्वत्र शुकशुकाट असल्याचा फायदा घेत बारच्या मागील बाजुचे शटर वाकवून बार मध्ये प्रवेश केल्यानंतर विविध कंपनीच्या व विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या लंपास करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २६ मार्च रोजी सकाळी या बारचे शटर वाकविल्याचे निदर्शनास आल्यानंतर बार मालक प्रमोद झाल्टे यांनी याठिकाणी धाव घेत पोलिसांना माहिती देवून तक्रार नोंदविली आहे. या चोरीत नेमका किती रूपयांचा मद्यसाठा लंपास झाला आहे. याची निश्चित आकडेवारी समोर आली नसली तरी लाखो रूपयांच्या मद्याची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Robbery at a beer bar in Chikhali city; Liquor worth millions of rupees stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.