डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:44 IST2021-05-18T11:44:09+5:302021-05-18T11:44:14+5:30
Buldhana News : वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत.

डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पेट्रोलसह डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिझेलचे दर वाढल्याने किराणा वस्तूंचे दरही वाढत चालले आहेत. वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत असून, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मजूर, कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने मदत केली असली तरी, अजून हाती पडली नाही. एकीकडे सर्वसामान्य त्रस्त असताना, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा अप्रत्यक्ष फटकाही सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. डिझेलचे दर वाढल्याने मालाच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. परिणामी, किराणा साहित्याचे दरही वाढत आहेत. मागील वर्षभरापासून किराणा वस्तूंच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून २०२० मध्ये डिझेलचे दर प्रतिलिटर ७२.२३ विक्री होत होते. ते आता ८८ रुपये ७५ पैसे प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे किराणा वस्तूंचे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरम्यान, सध्या कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत, याचा फायदा किराणा व्यापारी उठवित आहेत.