फार्मसी महाविद्यालयात चाेरीचा प्रयत्न
साखरखेर्डा : येथील स्व. भास्करराव शिंगणे कला प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाच्या लागून असलेल्या गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे.
जानेफळ येथील महादेव मंदिराचे नूतनीकरण
जानेफळ : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या महादेव मंदिराचे नुकतेच ठाणेदार राहुल गोंदे यांच्या संकल्पनेतून नूतनीकरण करण्यात आले आहे. येथील पोलीस ठाण्यात अवघ्या तीन ते चार महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या ठाणेदार राहुल गोंदे यांनी आपल्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या भगवान भोलेनाथाच्या मंदिराचे नूतनीकरणाचा निर्णय घेतला.
कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन
बुलडाणा : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूजच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कृषिदूत अजिंक्य तुळशीराम घोती यांच्या वतीने मौजे कुऱ्हा, तालुका मोताळा येथे घेण्यात आला.
डिजिटल सप्ताह उत्साहात साजरा
चिखली : तालुक्यातील किन्होळा ब्रह्मपुरी येथे ३ जुलै रोजी ग्रामपंचायत, ब्रह्मपुरी वाडी येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँक आणि नाबार्ड अंतर्गत किन्होळा शाखेच्या वतीने डिजिटल सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
किनगाव राजा बनले काेराेनाचे हाॅटस्पाॅट
किनगावराजा : येथे एकाच दिवसांत तब्बल १७ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे ग्रामस्थांसह प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. एवढे मोठे रुग्ण आढळून आल्यामुळे किनगावराजा पुन्हा एकदा कोरोनासाठी हॉटस्पॉट केंद्र ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
पांगरी येथे कृषिदिन उत्साहात साजरा
बुलडाणा : तालुक्यातील पांगरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात १ जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक तथा राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक आर.जी. देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप पीक नियोजन, कीडरोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
देऊळगाव मही येथे रक्तदान शिबिर
देऊळगाव मही : येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी, कोविडकाळातील सेवेबद्दल आशासेविकांचा सत्कार व वृक्षवाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे होते. प्रमुख उपस्थिती वृषाली बोंद्रे यांची होती.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
साखरखेर्डा : २८ जून राेजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आमखेड आणि अंबाशी येथील पाझर तलाव फुटल्याने कोराडी नदीला महापूर आला होता. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात घुसल्यामुळे शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.
दाऊद कुरेशी यांचा सत्कार
सिंदखेडराजा : कोरोनाच्या टाळेबंदीने गरजूंची होत असलेली उपासमार लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायतचे सरपंच दाऊदसेठ कुरेशी यांनी पाचशे लोकांना अन्नधान्य, किराणा सामान आणि आर्थिक मदत केली. त्यांचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात १ जुलै रोजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सन २०२०च्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेत विजेते प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
निपाणा येथे डाॅक्टरांचा सत्कार
माेताळा : तालुक्यातील निपाणा येथील ग्रामपंचायतमध्ये १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
लाेककला अकादमीची स्थापना
बुलडाणा : लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासाचे दृष्टीने महामानव लोककला अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. लोककला अकादमीची स्थापना झाल्यामुळे जिल्ह्यातील लोककलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अध्यक्षपदी समाजभूषण शाहीर डी.आर. इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.