न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:21+5:302021-07-07T04:43:21+5:30

बुलडाणा: न्यूमोनियामुळे अर्भक तथा बालमृत्यू रोखण्यासाठी आता न्यूमोकोकल लसीचा सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. देशात एक हजार ...

Pneumococcal vaccine will prevent infant mortality | न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू

न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू

बुलडाणा: न्यूमोनियामुळे अर्भक तथा बालमृत्यू रोखण्यासाठी आता न्यूमोकोकल लसीचा सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. देशात एक हजार मुलांमागे ३४ मुले निमोनियामुळे मृत्यू पावत असतानाच राज्यात त्याचे प्रमाण प्रती हजारी १९ असून बुलडाणा जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्क्यांच्या आसपास आहे. जुलै महिन्याच्या अखेरपासून राज्यात या लसीकरणास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यास मदत मिळणार आहे.

न्यूमोकाकल हा एक संसर्गजन्य आजार असून प्रामुख्याने वृद्ध व्यक्ती व बालकांना तो होताे. हिप न्यूमोनिया आणि न्यूमोकोकल निमोनियामुळे साधारणत: अर्भक आणि बालमृत्यू होतात. ते रोखण्यासाठी आता राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून हे लसीकरण सुरू होणार आहे. नवजात बालकाला दीड महिन्यानंतर पहिला, साडेतीन महिन्यानंतर दुसरा आणि ९ महिन्यानंतर तिसरा बुस्टर डोस गोवर लसीसोबत दिला जाणार आहे. देशातील पाच राज्यांमध्ये ही न्यूमोकोकल लस मधल्या काळात देण्यास प्रारंभ झाला होता. आता त्यात महाराष्ट्राचाही समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने नवजात अर्भक आणि १ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचा दोन प्रकारच्या न्यूमोनियामुळे मृत्यू होतो. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आता राज्यात सुरू करण्यात येणारे न्यूमोकोकल लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. देशात बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी एकूण १२ आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करण्यात येते. त्यातील दहा प्रकारचे लसीकरण हे राष्ट्रीय स्तरावरून होते. त्यात आता ११ व्या न्यूमोकोकल या लसीचाही समावेश करण्यात आला आहे. न्यूमोकोकल न्यूमोनियामुळे दरवर्षी देशात ५० हजार बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे बालमृत्यू रोखण्यात ही लस महत्त्वाची भूमिका निभावू शकणार आहे.

--बालकांचे सात टप्प्यात लसीकरण--

आपल्याकडे बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ० ते ६ वर्ष वयोगटादरम्यान एकूण सात टप्प्यात विविध आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात येते. जन्मत:, सहा आठवड्यानंतर, दहा आठवडे, १४ आठवडे, नऊ महिने पूर्ण झाले की, १६ ते २४ महिन्यादरम्यान आणि ५ ते ६ वर्षादरम्यान अशा टप्प्यात हे लसीकरण करण्यात येत असते.

-- काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया--

न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या व पिण्यात अडचण येऊ शकते, फिट येऊ शकते, बेशुद्ध हाेऊ शकतात व मृत्यू देखील होऊ शकतो.

--जिल्ह्यातील बालकांचा जन्म मृत्यू दर--

वर्ष जन्म अर्भक मृत्यू १ ते ५ वर्ष

२०१७-१८ ४६,४१७ ७५४ (१६.२४) ७१ (०.५५)

२०१८-१९ ४२,०६० ६९९ (१६.६१) ९२ (३.०७)

२०१९-२० ४१,९२७ ५७६ (१३.७२) ६८ (०.४४)

(मृत्यूची आकडेवारी ही १००० जन्मामागे मृत्यू अशी आहे.)

----

जुलै अखेर ही लस देण्यास प्रारंभ होईल. सार्वत्रिक लसीकरणांतर्गतच ही लस देण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून शासनाकडून निर्देश मिळताच हे लसीकरण सुरू करण्यात येईल.

(डॉ. रवींद्र गोफणे, माता बाल संगोपन आणि जिल्हा लसीकरण अधिकारी)

Web Title: Pneumococcal vaccine will prevent infant mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.