बारमाही तलाव, नैसर्गिक पाणवठे आटले!
By Admin | Updated: April 13, 2017 01:05 IST2017-04-13T01:05:48+5:302017-04-13T01:05:48+5:30
६४ जलस्रोत प्रभावित : सात वनपरिक्षेत्रातील जलस्तर घटला

बारमाही तलाव, नैसर्गिक पाणवठे आटले!
बुलडाणा: जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात बारमाही तलाव व नैसर्गिक पाणवठे आहे. यातून वन्यजिवांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते; मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरु होताच त्याचा फटका वनक्षेत्रास बसतो. परिणामी, सातही वनक्षेत्रातील बारमाही तलावातील जलस्तर घटला असून, नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.
जिल्हास मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून, यात जवळपास ३५ प्रजातीचे पशुपक्षी वास्तव्य करतात. या वन्य प्राण्यांना वर्षभर पाणी पुरविण्याची जबाबदारी वन विभागाने स्वीकारली आहे. शिवाय वनक्षेत्रात असलेले तलाव व नैसर्गिक पाणवठे यांचाही या प्राण्यांना मोठा आधार असतो. गत पाच वर्षांपासून दुष्काळी छळ सोसत असलेल्या जिल्ह्यात पाणीटंचाईचा फटका वन्य प्राण्यांनाही बसतो.
यंदा २०१६ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला खरा; मात्र नोव्हेंबरनंतर आजपर्यंत पावसाने जिल्ह्यात पाठ फिरविली. यामुळे नागरी क्षेत्रात पाणीपुरवठा करणारे धरण व तलावाने तळ गाठला आहे. शिवाय याचा मोठा परिणाम वनक्षेत्रातही आता पहायला मिळत आहे. गत तीन महिन्यांपासून वन्य प्राण्याची लोकवस्तीकडे पाणी व अन्नाच्या शोधात भटकंती सुरु झाल्यामुळे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घटत आहे.
बुलडाणा जिल्हा सात वनपरिक्षेत्रात विभागला गेला असून, यातील ३२ बारमाही तलाव व ६४ नैसर्गिक पाठवठ्यामधून वन्य जिवांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते; मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरु होताच त्याचा फटका वनक्षेत्रास बसतो. परिणामी, यंदा जळगाव जा. मोताळा, खामगाव, बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर व घाटबोरी वनक्षेत्रातील ६४ नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.
असे आहे वनक्षेत्रातील बारमाही तलाव
जळगाव जमोद परिक्षेत्रात कुंवरदेव, हनवतखेड, मोताळा परिक्षेत्रात पूर्व पलढग व नळगंगा, खामगाव परिक्षेत्रात हिवरखेड, लाखनवाडा, शिर्ला, पिंप्री, भोनगाव व जनुना, बुलडाणा परिक्षेत्रात पलढग, देऊळगावराजामध्ये दरेगाव, शिवणी टाका, गारखेड मेहकर परिक्षेत्रात धाड, टिटवी, गंधारी, भिवापूर, पिंपळनेर, जऊळका, चिखला, बिबखेड, कसारी तसेच घाटबोरीमध्ये मांडवा मन नदी, मोहन मन नदी वरवंड पाझरतलाव, उतावळी प्रकल्प व जनुना तलाव.