तीन महिने पुरेल एवढीच वैरण!
By Admin | Updated: November 13, 2015 01:54 IST2015-11-13T01:54:39+5:302015-11-13T01:54:39+5:30
अवर्षणसदृश स्थितीमुळे खामगाव तालुक्यात गुरांच्या वैरणाचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनण्याची शक्यता.

तीन महिने पुरेल एवढीच वैरण!
नाना हिवराळे /खामगाव : अवर्षणसदृश स्थितीमुळे खामगाव तालुक्यात गुरांच्या वैरणाचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनण्याची शक्यता असून, सध्या मार्चपर्यंंत पुरेल एवढीच वैरण उपलब्ध आहे. तालुक्यात दरवर्षी दोन लाख मेट्रिक टन चार्याचे उत्पादन अपेक्षित असते; मात्र यावर्षी अवर्षणसदृश स्थितीमुळे ५0 हजार मेट्रिक टन चार्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ८६ हजार गुरांच्या वैरणाचा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. तालुक्यात यावर्षी चार्याच्या उत्पादनामध्ये ३0 टक्के घट झाली आहे. परिणामी एक लाख ४९ हजार ५८९ मेट्रिक टन चाराच तालुक्यात उपलब्ध झाला आहे. खामगाव तालुक्यात १४८ गावे असून, त्यापैकी १३२ गावे ही आबाद तर १६ गावे उजाड आहेत. १९ व्या पंचवार्षिक पशुगणनेनुसार खामगाव तालुक्यात ७0 हजार हजार ४१४ मोठी गुरे तर १६ हजार २५६ लहान अशी ८६ हजार ३९८ गुरे तालुक्यात आहेत. त्यांना दरवर्षी साधारणत: दोन लाख तीन हजार मेट्रिक टन चार्याची गरज भासते. अवर्षणाच्या स्थितीमुळे तालुक्यात यावर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेती उत्पादनातून प्रत्यक्षात एक लाख ४९ हजार ५८९ मेट्रिक टन चाराच उपलब्ध होत आहे. त्यामुळे तालुक्यातील चारा उत्पादनात ३0 टक्के घट गृहित धरण्यात आल्याने मार्च अखेरपर्यंंतच उपलब्ध चारा तालुक्यात पुरणार आहे. त्यातच पडीक जमिनीमधून तालुक्यात दहा हजार ९७५ मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा प्रशासनाचा अंदाज होता; मात्र अवर्षणाच्या स्थितीमुळे हा चाराही उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे वैरणाचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर बनण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. एकीकडे शेतीपूरक व्यवसाय करण्याबाबत शासन स्तरावरून प्रोत्साहन दिले जाते; मात्र गेल्या दोन वर्षापासूनची अवर्षणाची स्थिती पाहता दुग्धोत्पादनाचा जोडधंदा करणार्या शेतकर्यांसमोर विपरीत परिस्थितीमुळे वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणत: मोठय़ा गुरांसाठी दररोज सहा किलो आणि छोट्या गुरांसाठी साधारणत: तीन किलो या प्रमाणे चारा तालुक्यात लागतो. उत्पादनातच घट झाल्याने वैरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे गुरे जगवणे शेतकर्यांना जिकिरीचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी खरिपात कमी झालेले वैरणाचे उत्पादन रब्बीतही कितपत भरून निघेल, हाही एक प्रश्न आहे.