सुलतानपूर : राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत सहकार क्षेत्रातील बँकांनाच शेतकऱ्यांची खरी जाण असून तेथे त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळत असल्याने त्यांनी प्रत्येक बाबतीत डिजिटल सेवा देण्यास सर्वतोपरी सक्षम झालेल्या जिल्हा सहकारी बँकेशी आपले व्यवहार पूर्ववत करावेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी केले. ते ९ जुलै रोजी नाबार्ड व जिल्हा सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानाअंतर्गत बोलावलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
स्थानिक वेदांत आश्रमातील कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर यांनी देखील मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य दिलीपराव वाघ, लोणार पं. स.चे गटनेते डॉ. हेमराज लाहोटी, काँग्रेसचे जिल्हा सचिव वामनराव झोरे, माजी सभापती किसनराव पिसे, शिवकुमार तेजनकर, पो. पा. राजू भानापुरे, सरपंच चंद्रकला नथ्थु अवचार हे उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव खरात, आयटी विभागाचे व्यवस्थापक सोमनाथ इतापे, विभागीय अधिकारी दिनेश अवस्थी यांनी उपस्थित शेतकरी व ग्राहकांना नाबार्ड व जिल्हा बँकेच्या विविध योजना आणि आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानाबाबत सखोल मार्गदर्शन केले़ या दिवशी नागरिकांनी बँकेला १० लाख ५० हजाराच्या ठेवी दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे प्रदीप धोंडगे, शाखाधिकारी विलास आमले, सचिव जी. एच. शेख, अमित तनपुरे, पी. के. चव्हाण, मदन चनखोरे, वसंत सिरसाट, केशव निकम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला माजी सरपंच विजय खोलगडे, सलीमखा पठाण, मिलिंद पिंपरकर, मारोतराव सुरुशे, हनुमंतराव चव्हाण, गोविंद रिंढे, प्रकाश भानापुरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते़