वनविभाग बनविणार झाडांची माहिती असलेली "आॅनलाईन लायब्ररी"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 19:49 IST2017-05-17T19:49:52+5:302017-05-17T19:49:52+5:30
व्हॉट्स अप, फेसबूकसह सोशल मिडीयावरही टाकणार झाडांची माहिती

वनविभाग बनविणार झाडांची माहिती असलेली "आॅनलाईन लायब्ररी"
ऑनलाइन लोकमत
विवेक चांदूरकर / बुलडाणा
जंगलातील विविध वृक्षांची ओळख व्हावी. औषधीयुक्त वृक्षांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, तसेच या माध्यमातून दुर्मिळ वृक्षांचे जतन व्हावे, याकरिता वनविभागाच्यावतीने आॅनलाईन लायब्ररी तयार करण्यात येणार आहे. या लायब्ररीमध्ये सर्वच प्रकारच्या वृक्षांची माहिती व त्याचे महत्व राहणार आहे.
राज्यातील वनामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, वृक्ष, विविध प्रकारचे गवत आहे. यापैकी काही वनस्पती दुर्मिळ तर काही औषधीयुक्त आहे. मात्र त्याची माहिती अनेकांना नाही. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जंगलातील सर्व वनस्पती व वृक्षांची माहिती नसते. परिणामी योग्यप्रकारे संवर्धन करण्यात येत नाही. त्यामुळे सर्वांना वृक्षांसंबंधीची माहिती व्हावी, याकरिता आॅनलाईन लायब्ररी तयार करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यानुसार जंगलात काम करणारे मजूर किंवा कर्मचारी जंगलात असलेल्या विविध वृक्षांचे, वनस्पतींचे फोटो काढून आणणार आहेत. एकाच झाडाचे चहूबाजुने, तसेच पानांचे खोडाचे, फुलांचे छायाचित्र काढण्यात येईल. वर्षाच्या वेगवेगळ्या कालखंडात झाडांचे फोटो काढण्यात येणार आहे. त्यानंतर सदर छायाचित्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात येईल. त्यानंतर झाडांचे छायाचित्र व माहितीसह लायब्ररी तयार करण्यात येईल. यामध्ये झाडाच्या शास्त्रीय नावापासून तर गुणधर्म कोणते आहेत, कोणत्या ऋतूमध्ये फुले व फळे येतात, याचीही माहिती राहणार आहे. ही लायब्ररी पुर्णता आॅनलाईन असणार आहे.
सोशल मिडीयावर राहणार झाडांची माहिती
लायब्ररीमध्ये असलेल्या झाडांची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप गृपवरही टाकण्यात येणार आहे. ज्या भागात जी झाडे आहेत. त्या भागातील कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्स अप गृपवर सदर माहिती टाकण्यात येईल. त्यामुळे झाडे ओळखणे सहज सोपे होणार आहे. तसेच फेसबूकवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आपल्या भागातील झाडे व त्यांचे
महत्व कळू शकणार आहे.
नव्या अधिकाऱ्यांना मिळेल माहिती
वनविभागामध्ये अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असतात. नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या जंगलातील झाडांची माहिती व्हायला वेळ लागतो. या लायब्ररीमळे अधिकाऱ्यांना कमी वेळात झाडांची परिपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच वनविभागात नव्याने रूजू होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्वरीत झाडांची संपूर्ण माहिती मिळणार आहे.