कार- दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 17:43 IST2018-05-21T17:43:43+5:302018-05-21T17:43:43+5:30
भरधाव कार व दुचाकी अपघातात बालिका ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २१ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान भादोला नजीक देवळी रस्त्याजवळ घडली.

कार- दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
बुलडाणा - भरधाव कार व दुचाकी अपघातात बालिका ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २१ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान भादोला नजीक देवळी रस्त्याजवळ घडली.
भादोला येथील गणेश बोरकर (३०) हे मुलगी खुशी (६ ) व दिव्यासोबत (८) दुचाकीने सासरवाडी वैरागड येथे जात होते. दरम्यान खामगावकडून भरधाव वेगात येणा-या (एम. एच.१४ बी. एक्स. ४७५४) क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात खुशीचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश बोरकर गंभीर जखमी झाले. मुलगी दिव्या हिला सुद्धा मार लागला. अपघाताची माहिती मिळताच भादोला ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ फोन करुन १०८ क्रमांकाची अॅम्बुलन्स बोलावण्यात आली. अॅम्बुलन्समधून दोघा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गणेश बोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला हलविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भागवत भुसारी यांनी दिली. अपघातानंतर कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरु आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
अपघातानंतर गंभीर जखमी गणेश बोरकर व त्यांची मुलगी दिव्या हिस उपचारासाठी अॅम्बुलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय गाठले. नातेवाईकांना बघुन गणेशची पत्नी रुपालीने एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.