धामणगाव-धाड मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:43 IST2018-11-09T17:43:11+5:302018-11-09T17:43:41+5:30
धाड: धामणगाव-धाड मार्गावरील बाणगंगा नदीवरील पुलाच्या संरक्षक लोखंडी अँगलला दुचाकी धडकून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

धामणगाव-धाड मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार
धाड: धामणगाव-धाड मार्गावरील बाणगंगा नदीवरील पुलाच्या संरक्षक लोखंडी अँगलला दुचाकी धडकून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार थेट पुलावरून नदीपात्रात कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. आठ नोव्हेंबरला रात्री हा अपघात घडला. कुलमखेड येथील सचीन विठोबा कानडजे (२६) हा डोमरूळ येथून आपल्या गावी दुचाकीवर येत होता. दरम्यान, धाड नजीक बाणगंगा नदीवरील संरक्षक लोखंडी अँगलला त्याची दुचाकी जोरात धडकली. दुचाकीची धडक जोरात असल्याने तो सरळ नदीपात्रात पुलावरून पडला. त्यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील तरुणांनी त्यास लोगलग रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच धाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन मोरे, ऋषीकेश पालवे, बळीराम खंडागळे हे करत आहेत. पुलाचा परिसर अपघात प्रवण धाड गावानजीकचा बाणगंगा नदीवरील हा पूल गेल्या काही दिवसापासून अपघात प्रवण बनला आहे. मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पुलाच्या परिसरात बर्याचदा अपघात झालेले आहेत. पुलाला दोन्ही बाजूंनीही मजबूत संरक्षक कठडे नाहीत. पुलाला लागूनच वळण रस्ता आहे. त्यातून हे अपघात होत असल्याची ओरड स्थानिक नागरिक करीत आहेत.