मालवाहू वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 15:32 IST2019-06-09T15:31:59+5:302019-06-09T15:32:17+5:30
मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

मालवाहू वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार
मेहकर : लग्न मंडपाचे लोखंडी साहित्य घेऊन जाणारा मालवाहू वाहन मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तोफिकचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मेहकर शहरात शनिवारी पालिकेच्या एका शाळेती कार्यक्रमासाठी मंडपाचे साहित्य आणण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रविवारी हे साहित्य मालवाहू वाहनअॅपेद्वारे परत नेण्यात येत होते. दरम्यान हे साहित्य नेत असताना मेहकरातील तोफिक मोहम्मद चौधरी हा युवक अॅपेमध्ये सामानाच्या सुरक्षेसाठी बसला होता. दरम्यान, अॅपे स्थानिक सावजी गल्लीतील रेणुका चौकातील चढावर आला असता अॅपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलने हा अॅपे अचानक उलटला. त्यामध्ये तौफिक अॅटोतून खाली पडला. सोबतच त्याच्या अंगावर अॅडोतील लोखंडी साहित्य व पाईप पडले. त्यात तोफिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला त्वरेने मेहकरातीलखासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान तौफिक मोहम्मद चौधरीची प्राणज्योत मालवली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
रेणुका चौक अपघात प्रवण स्थळ
मेहकर शहरातील रेणुका चौक परिसर अपघात प्रवण स्थळ बनू पाहत आहे. या ठिकाणी या पूर्वीही वाहनांचे चार ते पाच अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा रस्ता पालिकेने योग्य पद्धतीने करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.