अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव, (जि. बुलढाणा): राजपूत समाजाचे युगपुरूष महाराणा प्रताप यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. या घटनेचा राजपूत समाज बांधवांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात खामगाव शहर पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली.
स्थानिक राजपूत समाज बांधवांच्या वतीने माजी न. प. उपाध्यक्ष दर्शनसिंह ठाकूर व प्रमोद रामराव पाटील यांनी बुधवारी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, २८ मार्च २३ रोजी एका अज्ञात व्यक्तीने 'महाराणा प्रतापसिंह ११यु इंस्ट्रा प्रो' नावाने फेक अकाऊंट ओपन केले व त्यावर महाराणा प्रतापसिंह यांचेविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. हा प्रकार जयपूर लांडे येथील मोहन संजयसिंह पवार यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर मॅसेज पाठवून कॉल केला.
अज्ञात व्यक्तीने कॉल उचलला नाही. तसेच अज्ञात व्यक्तीने दुपारी १.२२ वाजताचे सुमारास फेक अकाऊंट बंद केले. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे समस्त राजपूत समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी त्वरीत चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी दर्शनसिंह ठाकुर, आर. आर. राठोड, माजी न.प. उपाध्यक्ष संजय (मुन्ना) पुरवार, तेजेंद्रसिंह चौहान, राजेंद्रसिंह सानंदा, डॉ. भगतसिंह राजपूत, राकेश राणा, कृष्णा ठाकुर, ईश्वरसिंह ठाकुर, सुभाषसिंह ठाकुर, विजयसिंह राजपूत, राजेशसिंह राजपूत, संदीप राजपूत व बबलु ठाकुर सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराणा प्रताप यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करणार्या अज्ञात इसमा विरोधात शहर पोलीसांत भादंवि कलम ५०५ (२), २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.