भाजीबाजारात फिजिकल डिस्टन्सिंग’ला फाटा; पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:33 IST2020-06-09T10:31:21+5:302020-06-09T10:33:16+5:30
भाजीपाला बाजारात हर्राशी दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी दंडुक्यांचा प्रसाद दिला.

भाजीबाजारात फिजिकल डिस्टन्सिंग’ला फाटा; पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांना चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन लागू असताना शहरातील भाजीपाला बाजारात हर्राशी दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी दंडुक्यांचा प्रसाद दिला. त्यामुळे बाजार परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दीडशेच्यावर नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
मलकापूरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, बाजार समिती प्रशासनाने भाजीबाजार बेलाड येथे हलविले होते. ते गैरसोयीचे होत असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या अटीसह पुन्हा हा भाजीबाजार बाजार समितीच्या जुन्या यार्डात सुरु करण्यात आला. या ठिकाणी भाजीपाला खरेदी व विक्री करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात आहे. याबाबत माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ८ वाजताचे सुमारास भेट दिली. यावेळी नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे पाहून पोलिसांनी नियम धाब्यावर बसविणाºयांना चांगलाच प्रसाद दिला. त्यामुळे अनेकांनी खरेदी केलेला भाजीपाला जागेवरच सोडून काढता पाय घेतला
कोरोना संसर्ग लक्षात घेता भाजीपाला हर्राशी बेलाड येथे नवीन यार्डात हलविली. तर फिजिकल डिस्टनसिंग पाळण्यासंबंधीत खबरदारी घेतली. लोकांच्या मागणी वरून पुन्हा शहरातील बाजार समितीच्या जुन्या यार्डात भाजीपाला खरेदी व विक्री सुविधा उपलब्ध करून दिली. पण नागरिक पथ्य पाळत नाही. यात आमचा दोष नाही.
-भरत जगताप, सचिव बाजार समिती, मलकापूर