खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात अखेर अविश्वास ठराव पारित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:03 IST2025-11-14T16:03:22+5:302025-11-14T16:03:51+5:30
अजित पवार गट प्रवेश ठरला निष्फळ...

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात अखेर अविश्वास ठराव पारित
खामगाव (जि. बुलढाणा): कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना शुक्रवारी अंतिम स्वरूप मिळाले. टीएमसी मार्केट यार्ड येथे शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता घेतलेल्या विशेष सभेत सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यात आले. यावेळी एकूण १८ सदस्यांपैकी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. मतदानावेळी १२ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने, तर प्रस्तावाविरोधात एकमेव सभापती सुभाष पेसोडे यांनी मतदान केले. तर पाच सदस्य अनुपस्थित राहिले. सभापतींविरोधात प्रस्ताव पारित झाला.
या प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी ही बैठक बोलावली होती. अनुपस्थित सदस्यांमध्ये विलास इंगळे, प्रमोदकुमार चिंचोलकर, किंमत कोकरे, गणेश ताठे व संजय झुनझुनवाला यांचा समावेश आहे.
यांनी केले परिवर्तन -
अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये श्रीकृष्ण टिकार, शांताराम पाटेखेडे, राजाराम काळणे, वैशाली मुजुमले, सुलोचना वानखडे, अशोक हटकर, संघपाल जाधव, गणेश माने, विनोद टिकार, सचिन वानखडे, मंगेश इंगळे व राजेश हेलोड यांचा समावेश होता. त्यामुळे आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सहज मिळाले आणि ठराव संमत झाल्याची घोषणा प्राधिकृत अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी केली. यावेळी सहायक निबंधक एस. के. गाराेळे, सचिव गजानन आमले, उपजिल्हाधिकारी कल्पेश तायडे, सहायक निबंधक अर्चना हिंगणकर आदींनी प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
चोख पोलिस बंदोबस्त
सभेच्या पार्श्वभूमीवर टीएमसी मार्केट यार्ड परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार व शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात होता. यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली.