मुंबई बाजार समिती: बुलडाण्याच्या खासदारांनी राखली प्रतिष्ठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:51 IST2020-03-03T14:31:42+5:302020-03-03T14:51:56+5:30
डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

मुंबई बाजार समिती: बुलडाण्याच्या खासदारांनी राखली प्रतिष्ठा!
- राजेश शेगोकार
अकोला : लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यापासून बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने खा.जाधव यांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा सदस्य निवडून आणला आहे.
वार्षिक हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत अमरावती विभागातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. भाजपला येथे पराभवाचा सामना करावा लागला.यवतमाळचे काँग्रेसचे प्रवीण देशमुख आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेनेचे माधवराव जाधव विजयी झाले आहेत. माधवराव हे प्रतापराव जाधव यांचे सख्ये बंधु आहेत. त्यांनी प्रथमच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने माधवराव यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही, असा त्यांचा होरा होता; मात्र बुलडाण्याच्या शेगाव येथील पांडुरंगदादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडाचा झेंडा फडकविला. पाटील हे यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजारवर सदस्य होते. ते डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्टÑवादी काँगे्रसच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही राहिले होते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमागे डॉ.शिंगणे यांचे पाठबळ आहे, अशीच चर्चा सहकार वर्तुळात होती. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते अर्ज मागे घेतील, ही अपेक्षा फोल ठरली व त्यांनी रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागातील अवघे दोन उमेदवार विजयी करायचे असल्याने पाटील यांची बंडखोरी सेनेचे उमेदवारी माधवराव जाधव यांना कठीण जाण्याचे संकेत होते, त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार व नामदार अशी लढाई रंगणार, असे संकेत होते. २८ फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतर
कोण बाजी मारणार, याची राजकीय चर्चा रंगली होती. त्या पृष्ठभूमीवर माधवराव जाधव यांचा विजय खासदार जाधव यांच्या रणनीतीचा विजय मानला जातो. अमरावती विभागातून यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे प्रवीण देशमुख ४८७ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माधवराव जाधव ४३७ मतांनी निवडून आले. रिंगणात कायम राहिलेले पांडुरंग पाटील यांना ३४१, गजानन चौधरी ४० तर भाऊराव ढवळे यांना ५ मते मिळाली.
सहकारात भाजपची ताकद कमीच
सहकार क्षेत्रात बहुतांश काँग्रेस-राष्टÑवादीचेच वर्चस्व आहे. त्यात शिवसेनेची साथ मिळाली. त्यामुळे अमरावती विभागातील संचालकांच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने पटकाविल्या. भाजपचे शेगाव येथील गोविंद मिरगे (३६) व पुसदचे दिलीप बेंद्रे (२२) हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. त्यांना मिळालेली मते पश्चिम विदर्भातील सहकारात भाजपची खरोखरच ताकद किती आहे, ही बाब अधोरेखित करणारी ठरली आहे