पंधरा वर्षांंपेक्षा जास्त जुनी वाहने रस्त्यावर
By Admin | Updated: October 30, 2015 02:05 IST2015-10-30T02:05:17+5:302015-10-30T02:05:17+5:30
वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह; परवाना नूतनीकरणात निरुत्साह!

पंधरा वर्षांंपेक्षा जास्त जुनी वाहने रस्त्यावर
बुलडाणा : रस्त्यावर धावणारे खासगी प्रवासी वाहन सुरक्षित आहे का? हे पाहण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची फिटनेस चाचणी घेण्यात येते.; मात्र २00१ पासून नवीन टॅक्सी परवाना देणे बंद केल्यानंतर फिटनेस चाचणी प्रक्रियेत खंड पडला. शिवाय नवीन वाहनं रस्त्यावर आले नाहीत. त्यामुळे १५ ते २0 वर्षे जुनी खासगी प्रवासी वाहने आजही जिल्ह्यातील रस्त्यांवर धावत आहेत. परिणामी, वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर व जिल्ह्यात खासगी प्रवासी व माल वाहतूक करणारी ४८ हजार १४९ एवढी वाहने आहेत. दैनंदिन उपयोगात आणल्या जाणार्या अशा वाहनांचा घसाराही अधिक होत असतो; परंतु त्याकडे वाहनमालक आणि चालकांकडून दुर्लक्ष होत असते. अशाच परिस्थितीत ती वाहने रस्त्यावर दामटविली जातात. त्यातून अपघाताचा धोकाही बळावतो, अशी वाहने वाहतुकीसाठी घातक ठरण्याची शक्यता अधिक असते; मात्र तरीही अशा वाहनांकडे दुर्लक्ष केल्या जाते. दरवर्षी अशा वाहनांचा फिटनेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासला जातो. यात वायूप्रदूषण चाचणी, हेडलाईट चाचणी, व्हील अलायनमेंट चाचणी, ब्रेक चाचणी, चेचीस व बॉडी नंबर चाचणी या कामासाठी आरटीओकडे केली जाते. वाहनचालकांना वायुप्रदूषण केंद्राकडून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करावे लागते. या निकषावर न उतरणारे वाहन कायमस्वरूपी अनफिट ठरविले जाते. राज्य शासनाने २00१ मध्ये आदेश काढून मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात टॅक्सी (कालीपिली) साठी परवाना देण्याचे बंद केले. यावेळी जिल्ह्यात १७६३ टॅक्सी परमिट असलेले वाहन रस्त्यावर धावत होते. यानंतर कुठलिही नवीन टॅक्सी परमिट वाहने जिल्ह्यातील रस्त्यावर आली नाहीत; मात्र पंधरा वर्षे जुनी वाहने आजही रस्त्यावर धावताना दिसतात. यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणही वाढत असल्यामुळे वाहनाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.