Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:43 IST2025-04-11T18:41:39+5:302025-04-11T18:43:38+5:30
महाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.

Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!
विदर्भात उष्णघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलाला कडक उन्हामुळे त्रास जाणून लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला अकोला येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले.
संस्कार सोनटक्के (वय, १२), असे उष्मघाताचा बळी ठरलेल्या मुलाचे नाव आहे. संस्कार हा इयत्ता सहावीत शिकत असून त्याला कडक उन्हामुळे त्रास झाल्याने त्याला अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. संस्कारच्या मृत्युनंतर अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविण्यात आले. तसेच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा उपाय आणि काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जात आहेत.
अनेक भागांत पारा वाढला
महाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अनेक भागांत तापमानाने चाळीशी गाठले आहे. नंदुरबार येथील जिल्ह्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या तामपानामुळे नागरिक हैराण झाले असून अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात उष्माघाती कक्षाची निर्मिती केली जात आहे.