बुलडाणा विभागातील २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 15:47 IST2020-03-09T15:44:08+5:302020-03-09T15:47:16+5:30
४० बसगाड्या स्क्रॅब करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बुलडाणा विभागातील २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील तब्बल २६ लाख नागरिकांची दळणवळणाची महत्त्वाची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागातील तब्बल २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात आली असून ४० बसगाड्या स्क्रॅब करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळास १६०० बसगाड्या देण्यासंदर्भात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. त्यामुळे एकट्या बुलडाणा विभागास १०० बसगाड्यांची गुणात्मक व दर्जेदार प्रवाशी सेवा देण्यासाठी गरज आहे. मात्र प्रत्यक्षात विभाग निहाय बसगाड्या वाटण्याचे सुत्र पाहता केवळ ५५ च्या आसपास बसगाड्या मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी ४५ बसगाड्यांची मागणी बुलडाणा विभागाकडून करण्यात आली होती.
मात्र त्यासाठी राज्यस्तरावर वेगाने हालचाली होऊन मुंबई येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जिल्हानिहाय त्वरेने या बसगाड्यांचा पुरवठा होण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या केवळ बसगाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या राज्यातील ३० विभागांना मिळण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
एकट्या बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता विभागातंर्गत ५०० च्या जवळपास बसगाड्या असून ४९० च्या आसपास दररोज शेड्यूल आहेत. दररोज एक लाख प्रवाशी या प्रमाणे महिन्याकाठी बुलडाणा जिल्ह्यात ३० लाख लोक एसटीवर भरवसा ठेवून सुरक्षीत प्रवासाची हमी असल्यामुळे लालपरीद्वारेच प्रवास करतात. त्यामुळे बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयातंर्गतच्या बसगाड्यांचे सरासरी प्रवासी भारमान हे ७२ टक्क्यांवर असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ए. यू. कच्छवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. जिल्ह्यातील एकूण उपलब्ध बसगाड्यांपैकी २०० बसगाड्या प्रत्येकी १० लाख किलोमीटर धावलेल्या आहेत किंवा त्यांची १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक बसगाड्या या जुनाट झाल्या आहेत. त्यांच्या जागी नव्या बसगाड्यांची गरज आहे.
दोन वर्षात २५० अपघात
एसटी बसगाड्याचे गेल्या दोन वर्षात २५० गंभीर व किरकोळ अपघात झालेले आहेत. जुनाट बसगाड्यांमुळे बस शेड्यूलवर असताना ती ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बुलडाणा आगारा त्वरेने नवीन बसगाड्या मिळण्याची अवश्यकता असून त्यादृष्टीने विभाग नियंत्रक संदीप रायलवार व यंत्रणा सध्या पाठपुरावा करत आहेत. बुलडाणा विभागातंर्गत ६० वाहन चालकांचेही लवकरच प्रशिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांनाही बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे.