वाढत्या वीजबिल वाढीविरोधात कंदील भेट आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:08+5:302021-07-07T04:43:08+5:30
लॉकडाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी मजूर व छोटे छोटे व्यावसायिक यांच्या आर्थिक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हाताला काम नाही ...

वाढत्या वीजबिल वाढीविरोधात कंदील भेट आंदोलन
लॉकडाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी मजूर व छोटे छोटे व्यावसायिक यांच्या आर्थिक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हाताला काम नाही म्हणून मजुरी नाही. व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या किंमती वाढत असतानाच वीजबिलसुद्धा सातत्याने वाढून येत आहे. युनिटची दरवाढ केल्यामुळे व अंदाजे बिले दिल्यामुळे गरीब, मध्यम वर्गीय तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांचे नियोजन कोलमडलेले आहे. हाताला काम नसताना एवढे वीजबिल कुठून भरणार अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. राज्य शासनाने ही वीजबिल वाढ त्वरित कमी करावी व शेतकरी , मजूर व छोटे मोठे व्यावसायिक यांना न्याय देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने आक्रमक पवित्रा घेऊन ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंदील भेट आंदोलन केले. या आंदोलनात महिला आघाडीच्या संयोजिका दीपाली इंगळे, जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल वाकोडे, रमेश खरे, सुषमा जाधव, मोरेताई, योगेश कांबळे, मयूर गवई, समाधान ताजने व अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
शेतकरी दुहेरी संकटात
वीजबिल न भरल्यामुळे त्यांच्या घराचा व शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेवटी काही कुटुंबांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बाजारात जाऊन कंदील आणावा लागत आहे. शेतकरी पाऊस पडत नाही म्हणून चिंतेत असताना, वीज पुरवठा खंडित केल्यामुळे तो आपल्या शेतातील पिकांना विहिरीमधील पाणीसुद्धा देऊ शकत नाही, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.