खरीप धोक्यात; दुबार पेरणीचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:11+5:302021-07-07T04:43:11+5:30
सुरुवातीला तालुक्याच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या; काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली. यातूनही काही प्रमाणात पिके ...

खरीप धोक्यात; दुबार पेरणीचे संकट!
सुरुवातीला तालुक्याच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या; काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली. यातूनही काही प्रमाणात पिके वाचली आहेत. त्या पिकांसह पावसाचा अभाव असलेल्या उर्वरित भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडो हेक्टरवरील पिके करपून जात आहेत.
तालुक्यात २८ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. परिणामी तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या होत्या. त्यापश्चात २९ जूनला दमदार पाऊस बरसला. मात्र, तालुक्यातील पूर्वेकडील भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या भागातील शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित झाली. शेतजमिनी वाहून गेल्याने शेती निरूपयोगी ठरली. अनेक शेतात पाणी शिरल्यानेही मोठे नुकसान झाले. २९ जूनच्या पावसाने उर्वरित तालुक्याला मात्र दिलासा मिळाला. त्या पावसाने जमिनीत झालेल्या ओलीच्या भरवशावर बळीराजाने शिवारात चाड्यावर मूठ ठेवली; त्यामुळे सर्वत्र पेरणीचा बार उडविण्यात आला. त्या पश्चात आठ दिवस उलटत असतानाही पावसाचा एक टिपूस पडला नसल्याने जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरलेले पीक आता करपून जात आहे. यामध्ये सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार संचाव्दारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्र उद्ध्वस्तीच्या मार्गावर आहे. पावसाअभावी नुकतेच अंकुरलेला कोवळा खरीप उन्हाच्या तडाख्याने होरपळू लागला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाची हीच स्थिती राहिल्यास दुबार पेरणी करावी तरी कशी, या विवंचनेत शेतकरी असून, या दोन-तीन दिवसात पावसाने कृपा केली तर ठीक, नसता संपूर्ण खरीप हातातून जाण्याची भीती आहे.
बळीराजा चिंताग्रस्त
तालुक्यात काही भागात खरिपातील पिकांची चांगली उगवण झाली आहे. त्यामुळे शेतशिवारात डवरणी, निंदणीची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, पावसाने सलग आठ दिवस दडी मारल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतातील पिके पिवळी पडली आहेत. खरिपावर ओढवलेल्या या संकटात केवळ पाऊसच तारणहार ठरणार आहे. मात्र, पावसाकडून तसे संकेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुबार पेरणीसाठी बियाणांची तजवीज करावी तरी कशी?
चिखली : तालुक्यात एकूण लागवडीचे क्षेत्र ८८ हजार ४२३ हेक्टर आहे. यापैकी खरिपातील प्रमुख पीक सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ६८ हजार ३८० हेक्टर एवढे आहे. यासाठी लागणारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाणे सुरुवातीला उपलब्ध होते. मात्र, आता जर पेरण्या उलटल्या तर ऐनवेळी बियाणांचीही चणचण भासणार आहे. त्यातच सध्या सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. यामध्ये बियाणे १२ रुपये किलोपर्यंत आहेत. बियाणांचे हे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने शेतकरीवर्गात अस्वस्थता आहे.