खामगाव : उत्पादन येण्याआधीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घट
By विवेक चांदुरकर | Updated: September 4, 2022 22:07 IST2022-09-04T22:07:18+5:302022-09-04T22:07:36+5:30
आताच भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

खामगाव : उत्पादन येण्याआधीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घट
सोयाबीनच्या शेंगा धरल्या असून, पुढील महिन्यात पीक येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे. शेतकऱ्यांचे पीक बाजारात आल्यावर दरवर्षीप्रमाणे आणखी भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गतवर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षीही जास्त भाव मिळेल या आशेने पेरणी केली. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख ९४ हजार ४२५ आहे. तर यावर्षी ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टरवर म्हणजे १००.७७ टक्के पेरणी झाली आहे. जास्त दर मिळेल या आशेने सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा सात हजार हेक्टरवर जास्त पेरणी करण्यात आली आहे.
सोयाबीनचे दर गत दहा दिवसांपर्यंत ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत होते. दोन महिने हेच दर स्थिर होते. मात्र, आता दहा दिवसांत सातशे ते आठशे रुपयांनी भाव घसरले आहेत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर ४३०० ते ५३०० पर्यंत आहे. एक महिन्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यावर आणखी भाव घसरण्याची शक्यता आहे. यावर्षी जिल्ह्यात पाऊस उशिरा झाला. त्यामुळे पेरणी उशिरा करण्यात आली. त्यातच जुलै महिन्यामध्ये सतत पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. यावर्षी जास्त भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आताच भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.