Jijau Janmotsav celebrations on 12th January at Sindhhed King; Lakhs of Jijau devotees will be present | सिंदखेड राजात १२ जानेवारी रोजी मॉ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; लाखो जिजाऊ भक्तांची राहणार उपस्थिती
सिंदखेड राजात १२ जानेवारी रोजी मॉ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; लाखो जिजाऊ भक्तांची राहणार उपस्थिती

ठळक मुद्देदिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता मॉ जिजाऊ यांचा ४२0 वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार यावर्षी सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या रहिवासी लेप्टनंट स्वाती महाडीक यांना शुक्रवारी शिवधर्म पीठावर प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे हे प्रमख आकर्षण राहणार आहे.
मराठा सेवा संघाच्यावतीने दरवर्षी सिंदखेड राजा नगरीत जिजाऊ सृष्टीवर हा उत्सव साजरा करण्यात येतो. ३ जानेवारीपासून या महोत्सवास सुरुवात होते. १२ जानेवारीला शिवधर्म पीठावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भाषणाने तथा आतषबाजी करून या जन्मोत्सवाचा समारोप होत असतो. त्यानुषंगाने १२ जानेवारीला सिंदखेड राजात दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, सूर्याेदयी मराठा सेवा संघ आणि त्यांच्या ३२ कक्षांतील प्रमुख जोडप्यांच्या हस्ते मासाहेब जिजाऊंची महापूजा करण्यात येईल. त्यानंतर वारकरी दिंडी सोहळा शिवभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या नेतृत्वात राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत निघेल. सकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. प्रारंभी आ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, पूर्वसंध्येला राजवाड्यावरून मशाल यात्राही काढण्यात आली होती. यामध्ये मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व शहरातील महिला वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. सोबतच राजवाड्यासमोर दीपही प्रज्वलित करण्यात आले होते.
दरम्यान, या महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सिंदखेड राजा नगरीत पोलिसांचा तगडा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती
- या कार्यक्रमास छत्रपती तथा सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नगर परिषदेच्यावतीने आयोजित सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 
- राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘माझी कन्या भाग्यश्री’ या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही सभा आम आदमी पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता ही सभा होणार आहे.


Web Title: Jijau Janmotsav celebrations on 12th January at Sindhhed King; Lakhs of Jijau devotees will be present
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.