तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: October 30, 2015 02:04 IST2015-10-30T02:04:07+5:302015-10-30T02:04:07+5:30
कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना ; १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित.

तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव
बुलडाणा : मलकापूर, मोताळा, बुलडाणा व चिखली या तालुक्यात १८ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा करण्यात आला असून, या तूर पिकावर विविध प्रकारच्या अळय़ांनी आक्रमण केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी अपुर्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली. कपाशी पिकानेही दगा दिला. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा तूर पिकावर होत्या. तथापि, तुरीवरसुद्धा अळ्यांनी आक्रमण केल्याने तुरीच्या उत्पादनात सुद्धा घट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या शेतकरी सोयाबीन सोंगणीत व रब्बीच्या तयारीत असल्याने तुरीला संरक्षित पाणी देण्याकडे दुर्लक्ष झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर मध्यंतरी वातावरणात झालेल्या बदलामुळे तूर पिकावर ४ प्रकारच्या अळ्यांनी आक्रमण केल्याचे दिसत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कीड नियंत्रक भगवान कुळकर्णी व १८ कर्मचार्यांच्या सर्वेक्षक चमूने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यापैकी शेंगा पोखरणार्या अळीचा पतंग पिवळसर असून, पुढील पंखावर काळे ठिपके तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या आहेत. ही अळी लहान असताना पानांवर तर पीक फुलोर्यावर असताना कळ्या, फुले व शेंगावर हल्ला चढविते. शेंगावर छिद्र पाडून अर्धी बाहेर राहून कच्चे दाणे फस्त करते. पिसारी पतंग असे नाव असलेली अळी लहान असताना कळ्या, फुले व शेंगांचा तर मोठी अळी दाण्यांचा फडशा पाडते. घाटे अळीनंतर शेंग माशी पिकांसाठी अतिघातक ठरते. पाने गुंडाळणारी अळी कळ्या फुले व शेंगाही उद्ध्वस्त करते.