भूजल पातळी दीड मीटरने खालावली!
By Admin | Updated: November 24, 2015 01:31 IST2015-11-24T01:31:18+5:302015-11-24T01:31:18+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा वाढला.

भूजल पातळी दीड मीटरने खालावली!
नीलेश जोशी / खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणावर वाढला असतानाच सलग दोन वर्षांपासूनच्या अवर्षणामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली असून, ती साडेचार मीटरवर पोहोचली आहे. परिणामी, जानेवारीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता तीव्रतेने जाणवण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १३७ गावात भूजलाचा बेसुमार उपसा वाढल्याने या भागात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहिरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील स्थितीही येत्या काळात बिकट बनणार आहे. दुसरीकडे देऊळगावराजा, लोणार, मेहकर आणि सिंदखेडराजा या घाटावरील चार तालुक्यात ही भूजल पातळी दोन मीटरपेक्षा अधिकने खाली गेल्यामुळे डिसेंबरअखेरच या भागात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता या भागात उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्हय़ाची गेल्या पाच वर्षांंची सरासरी भूजल पातळी ही ६.२१ मीटर आहे. त्या तुलनेत ऑक्टोबर २0१५ मध्ये १६७ निरीक्षण विहिरींच्या पाहणीनंतर सरासरी भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली आहे. वरकरणी असे दिसत असले तरी परतीचा पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पडला असला तरी नैसर्गिक पुनर्भरण या पावसात अत्यंत कमी झाल्याने आहे त्या पेक्षाही भूजल पातळी खोल असावी, अशी शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
*दोन तालुक्यात उपसा अधिक
घाटाखालील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यात भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील १३७ गावात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहीर, कूपनलिका, विंधन विहीर खोदण्यावर महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ नुसार बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रापैकी संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाणलोट क्षेत्रात उपसा बेसुमार वाढल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
*२0 टक्केच पाणी
नैसर्गिकरीत्या पडणार्या पावसाच्या पाण्यापैकी एक लाख ९५१ हेक्टर मीटर पाणी जमिनीत मुरत आहे तर पाच हजार १५१ हेक्टर मीटर पाणी नैसर्गिकरीत्या वाहून जात आहे. त्या तुलनेत ६५ हजार ९३६ हेक्टर मीटर पाण्याचा उपसा जिल्ह्यात होत आहे. परिणामी, उरलेल्या २९ हजार ८६४ हेक्टर मीटर पाण्यापैकी केवळ ३0 टक्केच भूजलाचा वापर करता येण्यासारखा आहे. त्यापैकी १0 ते १५ टक्केच पाणी प्रत्यक्षात आपण उपसू शकत नाही.