‘गुड’ भविष्यासाठी ‘गोड’ शब्दांची पेरणी आवश्यक - बारोमास’कार सदानंद देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:29 IST2019-01-22T18:28:41+5:302019-01-22T18:29:05+5:30
बुलडाणा: जग रहाटीत ‘वासना तशी फळे’, अशा आशयाच्या कितीतरी म्हणी आणि वाकप्रचार समाज व्यवस्थेला बांध घालण्यासाठी भाषिक व्यवहारात आहेत.

‘गुड’ भविष्यासाठी ‘गोड’ शब्दांची पेरणी आवश्यक - बारोमास’कार सदानंद देशमुख
बुलडाणा: जग रहाटीत ‘वासना तशी फळे’, अशा आशयाच्या कितीतरी म्हणी आणि वाकप्रचार समाज व्यवस्थेला बांध घालण्यासाठी भाषिक व्यवहारात आहेत. चांगल्या वासना ठेवल्या म्हणजे सकारात्मक विचार केला तर भविष्यावत चांगलेच घडत जाते, असे म्हणतात. पण ‘कळते पण वळत नाही’ या कात्रीत सापडलेले मन, सकारात्मकतेकडे वळायला कठीण. आणि ‘मन चिंती ते वैरीे ना चिंती’, असा अनुभव आपल्या आंतरिक आणि सामाजिक जीवन संघर्षात येत जातो. जीवनात संवाद प्रक्रिया सातत्याने जनाशी आणि मनाशी, अशा दोन पातळ््यावर सुरू असते. आपले भविष्य ‘गुड’ करायचे असले तर त्यासाठी ‘गोड’ शब्दांची पेरणी प्रयत्नपुर्वक करावी लागते. त्यातूनच ‘मग पेरले तसे उगवले’, हा अनुभव येतो. म्हणूनच आपल्या उद्याच्या भरघोस हंगामासाठी गोडूस शब्दांची पेरणी आवश्यक ठरते. याचे सजग भान या जिवनाच्या प्रवासात ठेवावे लागते. त्यासाठी जगदगुरू तुकाराम महाराजांनी दिलेला ‘आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू। शब्दची आमूच्या जीवाचे जीवन। शब्द वाटू धन जनलोका।।.’ हा जीवनमंत्र कधीही विसरू नये, हे साध्य झाले की सारेच ‘गुड गोड’ झाल्याची अनुभूती येत राहील. मनाशी निगडीत भाव भाषेतून व्यक्त होतात. ते व्यक्त करण्यासाठी उत्क्रांती काळात अनेक भाषांची निर्मिती झाली. भाषेतून जशा भावना व्यक्त होतात तसेच वातावरण व रस निर्मिती होते आणि तसेच घडत जाते.