गोहोगाव ते कऱ्हाळवाडी शेतरस्ता पोलीस बंदोबस्तात खुला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:16+5:302021-07-07T04:43:16+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा मेहकर : गोहगांव दांदडे ते कऱ्हाळवाडी शेतरस्ता ६ जुलै राेजी पाेलीस बंदाेबस्तात खुला करण्यात आला. ...

गोहोगाव ते कऱ्हाळवाडी शेतरस्ता पोलीस बंदोबस्तात खुला;
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा
मेहकर : गोहगांव दांदडे ते कऱ्हाळवाडी शेतरस्ता ६ जुलै राेजी पाेलीस बंदाेबस्तात खुला करण्यात आला. त्यामुळे या भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले व पदाधिकारी यांनी हा शेतरस्ता खुला करण्याची मागणी केली हाेती.
गोहगांव दांदडे ते कऱ्हाळवाडी शेतरस्त्याचा प्रश्न गत काही दिवसांपासून प्रलंबित हाेता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये फवारणी व डवरणी करायची आहे. त्यातच शेतरस्ता अडविल्यामुळे गावामध्ये वाद-विवाद होऊ शकतात व यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून तात्काळ संबंधित शेतरस्त्याची मोका पाहणी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी यांना आदेश द्यावेत व मोका पाहणी अहवाल तात्काळ मागवून सदर रस्ता वहिवाटीस खुला करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली हाेती. स्वाभिमानीच्या आंदाेलनाची दखल घेत अखेर ६ जुलै रोजी रस्ता खुला करण्याबाबतचे आदेश तहसीलदार मेहकर यांनी काढले. त्यानंतर रस्ता माेकळा करण्यात आला़
चाेख बंदाेबस्तात काढले अतिक्रमण
तहसीलदारांनी शेतरस्ता माेकळा करून देण्याचे आदेश दिल्यानंतर उपअधीक्षक भूमिअभिलेख यांना सुद्धा रेकॉर्डसह उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने बजावले हाेते. यावेळी महसूल प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंढे, मंडल अधिकारी रहाटे, तलाठी गोपाल उंबरकर, उपअधीक्षक तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे व भूमापक सानप, डोणगांव पोलीस स्टेशनअंतर्गत मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. जेसीबीच्या साहाय्याने हा शेतरस्ता खुला करण्यात आला.
स्वाभिमानीने केले हाेते लाक्षणिक उपाेषण
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह गोहगांव येथील बाधित शेतकऱ्यांनी १ जुलै रोजी तहसील कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली केले हाेते. तेथे प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करीत, महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मुक्काम आंदोलन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे, प्रशासनाने त्याची दखल घेत ६ जुलै राेजी रस्ता माेकळा करून दिला.