घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं; दोघांना कोठडी, पारखेड येथील आरोपींवर कारवाई
By सदानंद सिरसाट | Updated: July 17, 2023 18:18 IST2023-07-17T18:18:44+5:302023-07-17T18:18:55+5:30
शिकारीसाठी प्रतिबंधित असलेला वन्यप्राणी घोरपडीला पकडून त्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील पारखेड येथील दोन आरोपींना वनविभागाने शुक्रवारी अटक केली.

घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं; दोघांना कोठडी, पारखेड येथील आरोपींवर कारवाई
खामगाव (बुलढाणा) : शिकारीसाठी प्रतिबंधित असलेला वन्यप्राणी घोरपडीला पकडून त्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील पारखेड येथील दोन आरोपींना वनविभागाने शुक्रवारी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही शनिवार, रविवार अशा दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. खामगाव वनपरिक्षेत्रअंतर्गत खामगाव (पश्चिम) वर्तुळमधील हिवरखेड पश्चिम बीट अंतर्गत पारखेड येथे अवैधरीत्या वन्यप्राणी घोरपड पकडण्यात आली. त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडिया फेसबुकवर अपलोड करण्यात आला.
याबाबतची माहिती मिळाल्यानुसार घटनास्थळ पारखेड येथील आरोपी दत्तात्रय सुधाकर डोबे याची चौकशी करून ताब्यात घेतले. तसेच प्रकरणातील आरोपी अर्जुन रामदास कुऱ्हाडे (वय ३३) याला ताब्यात घेत घराचा झडती पंचनामा नोंदविला. त्याच्या घरातून तराजू, सुरा, चाकू यासारखे आक्षेपार्ह साहित्य मिळून आले. आरोपींनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस वनकोठडी देण्यात आली. पुढील तपास वनपाल एम. आर. आंग्रे करीत आहेत. ही कारवाई प्रादेशिक व कॅम्पा बुलढाणाचे सहायक वनसंरक्षक वडोदे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळ यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जी. पी. पालवे, बी. एम. दाभेराव, जावळे, जोशी, वाहनचालक बी. एम. बोंद्रे, मिलिंद इंगळे यांनी केली.