‘ज्ञानगंगा’तील पलढग धरणावर फ्लेमिंगोचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:14 IST2021-04-12T17:14:29+5:302021-04-12T17:14:39+5:30
Flamingo's visit to Paldhag Dam : ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाचा परिसर फ्लेमिंगोसाठी तुर्तास तरी पोषक ठरत असल्याचे चित्र आहे.

‘ज्ञानगंगा’तील पलढग धरणावर फ्लेमिंगोचे दर्शन
बुलडाणा: शहरानजीकच्या ‘ज्ञानगंगा’ अभयारण्यात असलेल्या पलढग धरणावर सलग दुसऱ्या वर्षी प्लेमिंगोचे आगमन झाले आहे. मानवी हस्तक्षेप या परिसरात कमी असल्यामुळे बहुता फ्लेमिंगोंनी या ठिकाणाला पसंती दिली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने पाणथळीच्या जागांवर फ्लेमिंगो आढळतात. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाचा परिसर फ्लेमिंगोसाठी तुर्तास तरी पोषक ठरत असल्याचे चित्र आहे.
भारतात प्रामुख्याने रोहित या नावाने हा पक्षी अेाळखला जातो. पाणथळ जागाी तो थव्याने राहणार पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहित पक्षाची पिसे गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची असतात. जगात आढळणाऱ्या त्याच्या चार प्रजातीपैकी दोन प्रजाती या आशिया खंडात आढळत असल्याची नोंद आहे. प्रामुख्याने स्थलांतरीत पक्षी म्हणून फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी अेाळखला जातो. गुजरात राज्यातील कच्छच्या रणमध्ये या पक्षाची व्याप्ती अधिक आहे. महाराष्ट्राचा विचार करता पुण्या जवळील उजनी धरणाच्या परिसरात या पक्षांसाठी आवश्यक असलेल्या उथळ जागा आहे. तेथे हिवाळ्यात तथा उन्हाळ्यात हे पक्षी थव्याने आढळतात.
त्यातच आता बुलडाणा जिल्ह्यातील पलढग धरणाच्या परिसरात सलग दुसऱ्या वर्षी फ्लेमिंगोचा थवा आढळून आल्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या ही बाब सकारात्मक आहे. त्यातच पलढग सरोवराचा परिसर वनपर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यात येत आहे. येथे नियमित स्वरुपात फ्लेमिंगो यावयास लागल्यास त्याचाही या पर्यटनाला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.