सैलानीचे वनपर्यटन केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:25 IST2019-03-31T16:25:04+5:302019-03-31T16:25:25+5:30
पिंपळगाव सराई : सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला गुरुवारी अचानक आग लागल्याने वनपर्यटन केंद्राच्या परिसरात लावलेली हजारो झाडे होरपळली.

सैलानीचे वनपर्यटन केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सराई : सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला गुरुवारी अचानक आग लागल्याने वनपर्यटन केंद्राच्या परिसरात लावलेली हजारो झाडे होरपळली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने सैलानी यात्रेतील गर्दी ओसरल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.
सैलानी येथील डोंगरावर २५ एकर परिसरात वनविभागाचे वनपर्यटन केंद्र आहे. आमदार राहुल बोंद्रे यांनी दिलेल्या ४ कोटी रुपयांच्या निधीतून हे वनपर्यटन केंद्र बांधण्यात आले आहे. याठिकाणी मुलांकरिता खेळणी, विविध प्रकारचे देखावे, वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. केंद्राच्या परिसरात तलावाचे सौंदर्यीकरण केलेले आहे. विश्रामगृह, स्वच्छतागृह आदी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. अद्याप हे वनपर्यटन केंद्र जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. केंद्राभोवती पुर्णपणे संरक्षण भिंत उभारलेली आहेत. परंतू काही ठिकाणी या संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
वनपर्यटन केंद्राच्या परिसरात हजारो झाडे लावलेली आहे. यापैकी बहुतेक झाडे ही दुर्मिळ वनौषधीची आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी पळसखेड येथील धरणावरुन पाईपलाईन केलेली आहे. दररोज पाणी दिल्या जात असल्याने झाडांची चांगली वाढ झालेली आहे. मात्र गुरुवारी वनपर्यटन केंद्राला अचानक आग लागली. यामध्ये दुर्मिळ प्रजातींची विविध झाडे जळ्याल्याने मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
मोठा अनर्थ टळला
सर्वधर्मिय एकात्मतेचे प्रतीक सैलानी यात्रा २० मार्चपासून सुरु झाली. यात्रेसाठी लाखो भाविकांची सैलानीत गर्दी झाली होती. भाविकांनी सैलानी परिसर व आजुबाजूच्या डोंगरावर झोपड्या उभारल्या होत्या. २५ मार्च रोजीच्या संदलपर्यंत ही गर्दी तशीच कायम होती. यात्रेदरम्यान गुरुवारी वनपर्यटन केंद्राला आग लागली. सुदैवाने त्यावेळी यात्रेतील गर्दी कमी झालेली होती. आजूबाजूच्या झोपड्यांना आगीची झळ पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला आग लागून झाडे जळाल्याबाबत आपणास माहिती नाही. संबंधित वनरक्षकांकडून घटनेची माहिती घेऊन झाडांची पाहणी करण्यात येईल.
- आर. टी. शिपे
प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) बुलडाणा