कर्जाला कंटाळून डोंगरखंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:47 IST2019-11-27T13:46:52+5:302019-11-27T13:47:34+5:30
उत्पन्न निघाले नसल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता.

कर्जाला कंटाळून डोंगरखंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
बुलडाणा : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील ६० वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंगरखंडाळा येथील बबन श्रीपत उबरहंडे यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे. शेतीवर कुटूंबाचा प्रपंच चालत नसल्याने ते मजुरीची कामे करायचे. यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे लागवडीचे पैसेही निघाले नाही. उत्पन्न निघाले नसल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. या विवंचनेतून त्यांनी आज पहाटे गावातील पाणीपुरवठा विहिरीत आत्महत्या केली. त्यांच्याकडे सेंट्रल बँकेच्या डोंगरखंडाळा शाखेचे १२ हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार इंगळे यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील रवी गवई, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन सावळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.