मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना
By निलेश जोशी | Updated: November 17, 2023 19:31 IST2023-11-17T19:30:15+5:302023-11-17T19:31:01+5:30
धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना
मोताळा/धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथील शेतकरी सुरेश शिवराम कळमकर (४०) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. दुचाकीवर शेतात जात असतांना एका नाल्याच्या काठीही घटना घडली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ते शेतात जात होते. रिशोदार शिवारातच त्यांच्यावर मधमाश्यांनी हा हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होत असतांनाही त्यांनी त्यांच्याबाबत घडत असलेल्या या प्रकाराची माहिती गावातील मित्राला फोन लावून दिली. त्यानंतर गावातून काही लोक तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा घटनास्थळी सुरेश कळमकर हे ग्रामस्थांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतक सुरेश कळमकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई ,वडील व भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे.
रुग्णवाहिका असूनही खासगी वाहनाचा आधार
धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे. मृकाच्या नातेवाईकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जखमी अवस्थेत सुरेश कळमकर यांना धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानामधून बोलावून आणावे लागले. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना त्यावरील चालक नव्हता. परिणामी खासगी वाहनाचा शोध घेऊन त्या वाहनाद्वारे सुरेश कळमकर यांना बुलडाणा येथे हलवावे लागले. या प्रकाराबाबात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.