बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट? एका उमेदवाराने पोलिसांच्या तावडीतून ‘बनावट’ मतदार पळवला; दोन जण पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:32 IST2025-12-02T18:32:31+5:302025-12-02T18:32:50+5:30
बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग ...

बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट? एका उमेदवाराने पोलिसांच्या तावडीतून ‘बनावट’ मतदार पळवला; दोन जण पकडले
बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग क्र. ६ मधील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे स्थानिक नागरिकांनी एका संशयित मतदाराला बनावट ओळखपत्रासह पकडले. मात्र, हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात देताच त्या प्रभागातील एका उमेदवाराने स्वतःच्या नातेवाइकाच्या मदतीने त्याला पळवून लावल्याची खळबळजनक घटना घडली. समाजमाध्यमांवर सध्या त्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे.
दरम्यान, प्रभाग क्र. १५ मधील गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरही कोथळी (ता. मोताळा) येथून कथितरीत्या मतदानासाठी आलेल्या दोन जणांना स्थानिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. प्राथमिक पडताळणीत त्यांची ओळख संशयित असल्याचे समोर आले असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ शरद पाटील यांनी दिली. दोन्ही प्रकरणांच्या चौकशीला सुरुवात झाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
प्रभाग ६ मधील तणावग्रस्त परिस्थिती--
जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राजवळ २०० मीटरच्या आत बोगस मतदार फिरत असल्याचे लक्षात येताच काही प्रतिनिधींनी त्याला रोखले व चौकशी केली. त्याच्याकडे सापडलेल्या बनावट ओळखपत्रामुळे संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावे, असा प्रयत्न होत असतानाच उमेदवार व त्याच्या नातेवाइकाने तो संशयित युवक पळवून लावल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे केंद्र संवेदनशील बनले असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
घाटाखालून दोन गाड्या भरून बोगस मतदार आले – सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादाला अधिक हवा देत समाजमाध्यमावर पोस्ट केली. घाटाखालून दोन गाड्यांत बोगस मतदार आणले गेले आणि काहींनी दुसऱ्याच नावावर मतदान करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तत्काळ कारवाईची मागणीही त्यांनी केली असून त्यामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण आणखी तापले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, बोगस मतदानाचा प्रयत्न हा एक वर्षांच्या शिक्षेस पात्र गुन्हा आहे. दोन्ही घटनांमुळे निवडणुकीतील शुचितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.