चक्क कचर्‍यात भरतोय रविवारचा बाजार!

By Admin | Updated: June 2, 2014 00:01 IST2014-06-01T23:59:28+5:302014-06-02T00:01:03+5:30

खामगाव नगरपालिका प्रशासनाच्या अवकृपेमुळेच भाजीबाजार चक्क कचर्‍यात भरत असल्याचे चित्र आहे.

Exhausted Sunday Market! | चक्क कचर्‍यात भरतोय रविवारचा बाजार!

चक्क कचर्‍यात भरतोय रविवारचा बाजार!

खामगाव : शहरातील साफसफाईकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. ऐन बाजाराच्या दिवशीही टिळक मैदानावर साफ सफाई केली जात नाही. त्यामुळे चक्क कचर्‍यातच रविवारचा बाजार भरविण्यात येत असल्याची विदारक परिस्थिती आहे. कचर्‍यातील विषाणू बाजारातील भाजीपाल्याद्वार्‍या नागरिकांच्या शरिरात पोहोचत असल्याने थेट नागरिकांच्या आरोग्यावरच नगर पालिका प्रशासन घाला घालीत असल्याचे चित्र आहे. बाजारासाठी आलेल्या किरकोळ विक्रेत्यांकडून बाजार वसुली केल्यानंतरही या बाजाराची नियमित साफसफाई केली जात नाही. हे येथे उल्लेखनिय! शहरात दर गुरूवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये खरेदी साठी शहरानजीकच्या खेड्यातील ग्रामस्थांनी गर्दी असते. या बाजाराच्या दिवशी बाजार करू न शकणारे नागरिक आणि शासकीय कर्मचारी रविवारच्या बाजारालाच महत्व देतात. शहरातील मध्यमवर्गीयांसोबतच उच्चभ्रू वस्तीतील नागरिक रविवारीच भाजीपाला आणि इतर खरेदी करीत असल्याने शहरात रविवारच्या बाजाराला मोठे महत्व आहे. मात्र, या बाजाराकडे नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. या बाजाराच्या नियमित साफसफाईकडे लक्ष दिल्या जात नाही. त्यामुळे कचर्‍याचे मोठे ढिग साचले आहेत. येथे भाजीपाला विक्रीसाठी येणार्‍या विक्रेत्यांना आपल्या दुकानापुरती साफसफाई स्वत:च करावी लागत असल्याचे आता नित्याचेच झाले आहे. परिसरातील काही लोक येथील खुल्या जागेवर सकाळचा विधी आटोपत असल्यानेही बाजारात मोठी दुर्गंधी पसरते. परंतु, कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने विक्रेते या ठिकाणी बाजार भरवितात.

Web Title: Exhausted Sunday Market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.