डोंबिवलीतील सायकलस्वार गंधारने पाच दिवसात पार केले ५२० किमी अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:56 IST2018-07-07T18:54:41+5:302018-07-07T18:56:29+5:30
ओतूर-संगमनेर-देवगड-औरंगाबाद असा प्रवास करत पाच दिवसात ५२० कि.मी.अंतर पार करून सायकलस्वार गंधार कुळकर्णी हा तरुण युवक ५ जुलै रोजी लोणार येथे पोहचला.

डोंबिवलीतील सायकलस्वार गंधारने पाच दिवसात पार केले ५२० किमी अंतर
लोणार : स्थानिक बोलींची ओळख व्हावी, म्हणून शब्दाची एक यादी त्या-त्या बोलीत अनुवादित करण्यासाठी तसेच भाषा शिकताना साहित्यापलिकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघण्याची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ओतूर-संगमनेर-देवगड-औरंगाबाद असा प्रवास करत पाच दिवसात ५२० कि.मी.अंतर पार करून सायकलस्वार गंधार कुळकर्णी हा तरुण युवक ५ जुलै रोजी लोणार येथे पोहचला. शाळेत शिकवताना सध्याच्या शिक्षणात प्रयोगशीलतेचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना चाकोरी बद्ध शिक्षण देऊन केवळ नोकरदार वर्ग निर्माण होतो आहे, असे लक्षात आल्याने या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी डोंबिवलीतील गंधार कुळकर्णी याने सव्वा वर्षाची सायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखली आहे. मोहिम पूर्ण झाल्यावर भाषा अध्ययन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे, नाविन्य पूर्ण मॉडेल तयार करण्याचे त्याचे स्वप्न आहे. रोज एका शाळेत दीड ते दोन तास जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन या विषयावर संवाद साधायचा. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा, यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वत:च्या भाषेविषयी जाणीव करून द्यायची, स्थानिक बोलींची ओळख व्हावी, म्हणून शब्दाची एक यादी त्या-त्या बोलीत अनुवादित करुन घ्यायची, भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्या पलिकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघण्याची जाणीव निर्माण करायची, ही उद्दिष्टे घेऊन १ जुलै रोजी गंधार कुळकर्णी डोंबिवलीहून निघाला होता. ओतूर-संगमनेर-देवगड-औरंगाबाद असा प्रवास करत पाच दिवसात तब्बल ५२० किमी अंतर पार करून तो ५ जुलै रोजी लोणार येथे पोहचला. शुक्रवारी त्याने श्री शिवाजी हायस्कूल, लोणार येथे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी मातृभाषेविषयी संवाद साधला. गंधार नागपूरला १२ जुलैपर्यंत पोहचणार आहे. त्याच्यापुढे १३ जुलै ला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताच्या मार्गाने रामटेकहून निघून हरिद्वारला पोहचेल. त्याच्या पुढचा मार्ग विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जोडणारा त्याने आखला आहे. जवळजवळ वीस हजार किलोमीटरचे सायकलिंग होईल, असे ‘लोकमत’शी बोलतांना गंधार कुळकर्णी सांगितले.
संस्कृत विभागानेही घेतली गंधारच्या मोहीमेची दखल
गंधार कुळकर्णी ने पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम.ए. पूर्ण केले आहे. संस्कृत विभागानेही या मोहीमेची दखल घेतली आहे. ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राचा ही मोहीम साकार होण्यात खूप मोठा वाटा आहे. स्कॉट-बर्गमाँट या जर्मन कंपनीने प्रायोजकत्वाच्या स्वरूपात ३४ हजार रुपयांची हेलिक्स ३.५ आय ही सायकल देऊ केली आहे. असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदतही प्रवासा दरम्यान होणार आहे. भारत परिक्रमा करून आलेले सचिन गावकर यांचे गंधारला मार्गदर्शन लाभले आहे.