देऊळगावराजा : मेहुणाराजात स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:33 IST2018-01-18T00:31:07+5:302018-01-18T00:33:40+5:30
देऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली.

देऊळगावराजा : मेहुणाराजात स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकले
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली. पोलीस पाटील नारायण देवराव दहातोंडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात स्त्री-पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मेहुणाराजा गावालगत रोहणा फाट्याकडे जाणार्या जुन्या रस्त्यावर घरांच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत नवजात अर्भक असल्याची चर्चा बुधवारी सकाळी वेगाने पसरली. हा प्रकार पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी घटनास्थळ असलेल्या विहिरीकडे धाव घेतली. पोलीस पाटील नारायण दहातोंडे यांनी शहानिशा करून देऊळगाव मही पोलीस चौकीचे पीएसआय अकील काझी यांना माहिती दिली. यावरून पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्त्री जातीचे मृतक अर्भक ताब्यात घेऊन पंचनामा केला. पो.पा. दहातोंडे यांच्या फिर्यादीवरून देऊळगावराजा पोलीस स्टेशनला अज्ञात स्त्री-पुरुषाविरुद्ध भादंवि कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अकील काझी पुढील तपास करीत आहेत. मृतक अर्भकावर देऊळगावमही येथे अंत्यविधी झाल्याची माहिती पीएसआय मंजूषा मोरे यांनी दिली. सदर घटनेतील आरोपी व मृतक अर्भकाची माता शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, मेहुणाराजातून घटनेची माहिती असणार्या एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.