त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST2021-05-28T04:25:40+5:302021-05-28T04:25:40+5:30
ग्रामीण रुग्णालयात युवकांनी केली स्वच्छता हिवरा आश्रम : येथील जनसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून तरुणांसह ग्रामस्थांनी दि. २० ...

त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
ग्रामीण रुग्णालयात युवकांनी केली स्वच्छता
हिवरा आश्रम : येथील जनसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून तरुणांसह ग्रामस्थांनी दि. २० मे रोजी एकत्र येऊन ग्रामीण रुग्णालयात साफसफाई करून लोकसेवेचा आदर्श निर्माण केला. तरुण स्वयंसेवकांनी इमारतीची साफसफाई केली, तर इमारत परिसरातील वाढलेली काटेरी झाडेझुडपे श्रमदान करून साफ केली.
१२६५ पालकांनी केली पुस्तके परत
बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे़. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत.
मलकापूर पांग्रा येथे वीजपुरवठ्याची समस्या
मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे गावकऱ्यांना वर्गणी करून खासगी लाईनमनकडून वीजपुरवठ्याची कामे करून घ्यावी लागत आहेत़
बुरशीनाशक कल्चर यंत्र धूळ खात
बुलडाणा : निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागतो. त्यात बुरशीनाशक कल्चर मशीन हेसुद्धा टेक्निशियनअभावी वापरले जात नाही आणि ही यंत्रणा धूळ खात पडली आहे. तालुकास्तरावर या प्रमाणाच्या मूल्यांकनासाठी तसेच कल्चर मशीनसाठी टेक्निशियन नेमण्यात यावा, अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे.
विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या दुचाकी सुसाट
बुलडाणा : कडक निर्बंधाच्या काळातही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या दुचाकी रस्त्याने सुसाट धावत आहेत. पोलिसांनी बुलडाणा शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त लावला. येणाऱ्या प्रत्येक दुचाकीचालकाची चौकशीसुद्धा केली; परंतु दुचाकीचालक वेगवेगळे कारणे सांगत आहेत.
वर्षभरात ३२ बालविवाह रोखले
बुलडाणा : गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३२ बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आले आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी जिल्ह्यात होणारे बालविवाह चिंताजनक आहे.
२७ रस्ते कामाची प्रतीक्षा
बुलडाणा : तालुक्यात ४० पैकी १३ पांदण रस्त्यांचे काम झालेले आहे. उर्वरित २७ रस्ते कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पांदण रस्त्याच्या कामासाठी एका किलोमीटरमागे साधारणत: ५० हजार रुपयांचा खर्च येतो.
स्थलांतरितांची संख्या वाढली
धाड : महानगरांमध्ये कामासाठी गेलेल्या नागरिकांनी घरवापसी केल्याने परिसरात स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने त्यांच्यावर नजर ठेवून खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण करा
बुलडाणा : जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
धामणगाव बढे : परिसरातील अनेक शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खरीप हंगामास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राहेरी पुलाचा प्रश्न लागला मार्गी
सिंदखेडराजा : तालुक्यातील राहेरीजवळील पुलाच्या बांधकामासाठी ९ काेटी ८५ लाख मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.
पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निकाली काढा
बुलडाणा : यावर्षी मान्सून लवकरच दाखल हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे १ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाची प्रकरणे तातडीने मंजूर करून निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चांडाेळ येथे लसीचा तुटवडा
चांडाेळ : कोरोनाला आळा घालण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना लसीचे महत्त्व पटल्यामुळे असंख्य नागरिक लस घेण्यासाठी येथील आरोग्य केंद्रात येत आहेत.