खरीप हंगामासाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

By Admin | Updated: April 19, 2017 01:59 IST2017-04-19T01:59:26+5:302017-04-19T01:59:26+5:30

बुलडाणा- कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे.

Demand for 1.5 lakh quintals for the kharif season | खरीप हंगामासाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

खरीप हंगामासाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

कृषी विभागाचा बियाणे पुरवठा, विक्री अहवाल
बुलडाणा : सततची नापिकी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, शेतमालाला कमी भाव आदी समस्यांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडून निघाला आहे. कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे.
जिल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असून, १०० टक्के पेरणीची उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून बियाणे व खतांचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिला. सध्या शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी सुरु झाली नसली, तरी हंगामाच्या नियोजनानुसार, कृषी विभागाकडे बियाण्यांची पुरेशी उपलब्धता ठेवणे आवश्यक आहे; मात्र कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेल्या खरीप पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यातील तेराही तालुक्यासाठी चौदा पीक प्रकाराच्या बियाण्यांसाठी १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटलची मागणी दर्शविण्यात आली आहे. यात सार्वजनिक ३८ हजार ५८० क्विंटल आणि खासगी स्वरुपात ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे; मात्र यावर्षी सोयाबीन व इतर काही पेरणी क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. लवकरच शेतात बियाणे पेरण्याचे काम चालू होणार आहे.

पेरणी क्षेत्र घटले, पीक क्षेत्र वाढले!
जिल्ह्यात २०१६-१७ या खरीप हंगामात ७ लाख ४९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते; मात्र यंदा २०१७-१८ या वर्षात पेरणी क्षेत्रात १ हजार ७२२ हेक्टरने घट करण्यात आली असून, ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टरचे नियोजन आहे, तर जिल्ह्यात सोयाबीन पिकांचे २ लाख ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र निर्धारित असताना पीक क्षेत्रात वाढ करुन ३ लाख ८५ हजार ३०० हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन व कापूस या व्यतिरिक्त तूर उत्पादक शेतकरी जास्त असल्यामुळे तुरीचे क्षेत्र ६५ हजार हेक्टर निर्धारित असताना ८५ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उपलब्ध बियाण्यांची कमतरता भासू शकते.

Web Title: Demand for 1.5 lakh quintals for the kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.