बल्लाळदेवीचे मूळ रूपात दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:55+5:302021-07-07T04:42:55+5:30
तालुक्यातील अमडापूर येथे बल्लाळदेवीचे ऐतिहासिक व पांडवकालीन मंदिर आहे. अज्ञातवासात असताना तेथे पांडवांचे वास्तव्य होते, अशी अमडापूर परिसरात दंतकथा ...

बल्लाळदेवीचे मूळ रूपात दर्शन !
तालुक्यातील अमडापूर येथे बल्लाळदेवीचे ऐतिहासिक व पांडवकालीन मंदिर आहे. अज्ञातवासात असताना तेथे पांडवांचे वास्तव्य होते, अशी अमडापूर परिसरात दंतकथा आहे. ग्रामदैवत बल्लाळदेवीच्या मंदिरात पुरातन पांडवकालीन मूर्तीची तब्बल सहा फूट लांबीची पावले व सहा फुटाचा घेर असलेली तलवारीचे मूठ धारण केलेले देवीचे ‘हात’ आदी भव्य मूर्तीचे अवशेष आहेत. या मंदिरासमोर प्रसिद्ध महानंदीची प्रतिकृती आहे. जवळच पाच फणा असलेले नागराजाचे शिल्प आहे. भैरवाची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच गाभाऱ्यात अष्टदशभूजादेवीची भव्य प्रतिमा भाविकांचे मन श्रद्धेने मोहून टाकते. या प्रतिमेशेजारी देवीची मूळ मूर्ती आहे. भाविकांव्दारे श्रध्देने या मूर्तीला शेंदुराचा लेप लावण्यात येत असल्याने देवीच्या मूळ मूर्तीचे मोहक रूप कालौघात झाकोळले होते. ४ जुलैच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास मूळ मूर्तीवरील शेंदुराची ही खोळ आपोआप गळून पडल्याने देवीच्या मूर्तीचे खरे व अत्यंत सुंदर असे मोहक रूप समोर आले. याबाबत परिसरात वार्ता पसरताच मंदिरावर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर गाठले होते. ५ जुलैला सकाळी ११ वाजता बल्लाळदेवी संस्थानचे अध्यक्ष वल्लभराव देशमुख यांनी सपत्नीक विधिवत अभिषेक करून व पुन्हा शेंदूर लेपन करून पूजा व आरती केली.
सर्वांगसुंदर व प्रसन्न मुद्रेचे दर्शन!
मूर्तीवरील शेंदुराचा थर गळून पडल्यानंतर अत्यंत सुंदर व प्रसन्न मुद्रेतील मोहक मूर्तीचे दर्शन सध्या घडत आहे. साक्षात महालक्ष्मीच्या स्वरूपातील देवीच्या या रूपाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी सध्या मंदिरात गर्दी होत आहे. संस्थानच्यावतीने यथासांग पूजन करून, गळून पडलेल्या खोळीचे ब्राम्हणवाडा धरणात विसर्जन करण्यात आले आहे.