CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:10 IST2020-04-13T11:09:59+5:302020-04-13T11:10:18+5:30
एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला सुमारे ८ कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. ‘लॉकडाउन’ आणखी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘लॉकडाउन’चे पालन व्हावे, यादृष्टीकोणानातून प्रत्येक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून याठिकाणी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे २१ दिवसांच्या ‘लॉकडाउन’च्या काळात एसटीच्या बुलडाणा विभागाला ८ कोटी ८० लाखांचा फटका बसला आहे. दरम्यान, देशात सुरुवातीला लागू करण्यात आलेले २१ दिवसांचे ‘लॉकडाउन’ १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र राज्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ‘लॉकडाउन’ ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरून एसटीच्या बुलडाणा विभागाला कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. मात्र ३० एप्रिलपर्यंत सेवा बंद राहिल्यास बुलडाणा विभागाचे नुकसान आणखी ६ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एसटी महामंडळाची सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात राज्यस्तरावर चर्चा सुरू आहे. त्या त्या विभागातील आजाराची तीव्रता पाहून लांब पल्ल्याच्या बस वगळता इतर सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. यानुसार बुलडाणा विभागाबाबत काय निर्णय होतो, यावरच पुढील दिशा ठरणार आहे.
-संदीप रायलवार,
विभाग नियंत्रक, बुलडाणा.