भाजपातील कलह काँग्रेसला पोषक

By Admin | Updated: August 19, 2014 23:15 IST2014-08-19T22:43:52+5:302014-08-19T23:15:59+5:30

कार्यकर्त्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष दूर करण्यात आमदार बोंद्रे बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहेत.

Conflicts in the BJP are contagious to the Congress | भाजपातील कलह काँग्रेसला पोषक

भाजपातील कलह काँग्रेसला पोषक

चिखली: चिखली मतदार संघात काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष दूर करण्यात आमदार बोंद्रे बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहेत. पक्षीय पातळीवर या बहाद्दराने विरोधकच शिल्लक ठेवलेला नाही. जे आहेत ते केवळ बोलघेवडेपणा करून तोंडाची वाफ गमावण्यात धन्यता मानत असल्याने आ.बोंद्रे यांचेही बरेच फावते. अशीच अवस्था त्यांनी भाजपवाल्यांची करून ठेवली आहे. भाजपावाले मूग गिळून गप्प आहेत. वास्तविक जनतेच्या अनेक समस्यांवर भाजपवाल्यांना रान पेटवता आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा लोहपुरूष त्यांच्या पाठीशी असताना भाजपावाले अनेक समस्यांवर आंदोलने छेडू शकले असते. परंतू दुर्देवाने तसे घडले नाही अन् भविष्यातही तसे घडण्याची सुतराम शक्यता नाही. असे असताना एक गोष्ट मात्र अत्यंत शिस्तबध्दरित्या घडतांना दिसून येत आहे. ते म्हणजे भाजपा अंतर्गत चाललेली बंडाळी. ह्यमोदी फीव्हरह्णचा जोर असतानाही अंतर्गत भांडाणांमुळे या मतदारसंघात भाजपाचे भविष्य अवघड असल्याचे चित्र आहे. नवे विरूध्द जुने हा वाद भाजपात पेटला आहे. मोदीजींनी एकाच फटक्यात केंद्रात भरभरून मिळविलेले यश चिखलीच्या भाजपावाल्यांच्या डोक्यात शिरलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षांची केलेली धुळधाण पाहून भाजपाकडे येणार्‍यांचा ओढा असणे सहाजीकच आहे. परंतू हीच बाब जुन्या जाणत्यांना खुपते आहे. नवख्यांची सुरू असलेली हेळसांड त्यांना देण्यात येणारी अपमानजनक वागणूक काँग्रेसच्या पथ्यावर पडत आहे. याचाही सोयीस्कर विसर भाजपावाल्यांना पडला आहे. उमेदवारी मिळण्याचे मेरीट पक्षाने आखून दिले आहेत. त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न भाजपावाल्यांनी करणे गरजेचे आहे. दूसरीकडे या पक्षातुन इच्छूक असलेले संजय चेके पाटील यांनीच कार्यक्रमाचा धडाका लावला असुन सध्या बाकीचे स्पर्धक बॅकफुट वरच आहेत.
काँग्रेसेचे विद्यमान आमदार आ. राहूल बोंद्रे यांचे काम जोमात सुरू आहे. गरूडझेप प्रकल्प, नदी खोलीकरण, पांदणरस्ते, भूमीपुत्र ग्रामदरबार यासारखे असंख्य राज्याला पथदश्री ठरणारे प्रकल्प लोकसहभागातून राहुल बोंद्रे राबवित आहेत. त्यामुळे त्यांचा आलेख चढता आहे. प्रतिकूल राजकीय स्थिती असताना देखील ते आपल्या कामात मग्न आहेत. तर दुसरीकडे अनुकूल स्थिती असूनही केवळ हेवेदाव्यांमुळे भाजपाच्या गोटात स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेतेही याकडे लक्ष घालण्यास तयार नाहीत. त्यांनी थोडे लक्ष घातले तर काँग्रेसचे पानीपत व्हायला वेळ लागणार नाही. आ.बोंदे यांनाही निवडणूक सोपी नाही त्यांनाही अनेक समस्यांनी घेरलेले आहे. भाऊबंदकीचा फटका त्यांनाही बसणार आहे. गतवेळी त्यांचे काका भारतभाऊ बोंद्रे विरोधात होते. तर यावेळी त्यांचे चुलत भाऊ माजी नगराध्यक्ष विनायक बोंद्रे हे बसपाकडून लढण्याची भाषा करीत आहेत. पालीकेचे विद्यमान स्विकृत सदस्य कुणाल बोंद्रे यांनीही काँगेसकडून उमेदवारी मागतली आहे. त्यामुळे अडचणी वाढतील. या दुहीच्या परिस्थितीचा फायदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला होवू शकतो. स्वाभिमानीचे नेते चिखलीची जागा सोडून घेण्यासाठी जिद्दीला पेटले आहेत. भाजपाची अंतर्गत दुही ही स्वाभिमानीला पोषक ठरू शकते. स्वाभिमानीेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हा बहुजन चेहरा आहे. शेतकरी आंदोलनातून तावून सलाखून निघाल्याने सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण आहे. हे ध्यानी घेवून भाजपवाल्यांनी आपसी नवे-जुने असा वाद मिटवून एकत्रीतपणे सामोरे जावे अन्यथा, 'नशीबाने मिळालेलं कर्माने नेलं' अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.
 

Web Title: Conflicts in the BJP are contagious to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.