Clashesh between two groups in khamgaon | क्षुल्लक कारणावरून खामगावात दोन गटात वाद!
क्षुल्लक कारणावरून खामगावात दोन गटात वाद!

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  क्षुल्लक कारणावरून शहरातील शंकर नगरात दोन गटात वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारींवरून शहर पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये एक जण अटकेत असून, शंकर नगरात तणावपूर्ण शांतता आहे.

शंकर नगरातील २७ वर्षीय युवती बाहेर पाणी फेकण्यास आली असता, तिला घरासमोर भांडण सुरू असल्याचे दिसून आले. या भांडणात तिच्या भावाला काही युवक मारहाण करीत होते. अशी तक्रार नम्रता नरेंद्र सारसर या युवतीने शहर पोलिसात दिली. यावरून शहर पोलिसांनी  विकी नरवाडे, शुभम उमाळे, सागर निंबाळकर, धम्मा इंगळे  यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तर रखमाबाई मधुकर उमाळे (६५) या महिलेने शहर पोलिसात तक्रार दिली की, त्यांच्या नातीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे त्यांचा मुलगा प्रल्हाद यांच्यासाठी यांचा नातू शुभम डबा घेवून जात होता. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून नातवास शिविगाळ केली. यावेळी वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी मंडपात जावून प्रल्हाद उमाळे यांच्या डोक्यात लाकडी बॅटने मारहाण केली. तर भांडण सोडविण्यास गेलेल्या बंटी मोरे यालाही मारहाण केली. रखमाबाई उमाळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी हरीश सारसर, नरेंद्र सारसर, चेतन सारसर, अजय सारसर, बबली सारसर,  विकी सारसर, लकी सारसर, धरम सारसर यांच्या विरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. यावेळी दोन गटात हाणामारी सुरू असताना शहर पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी शहर पोलिसांनी नरेश सारवान यास अटक केली.


Web Title: Clashesh between two groups in khamgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.