अवैध बायोडिझलप्रकरणी मलकापुरात गुन्हे दाखल
By सदानंद सिरसाट | Updated: October 5, 2023 22:52 IST2023-10-05T22:51:42+5:302023-10-05T22:52:10+5:30
लोकमतने बायोडिझेलची विक्री होत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत ७ सप्टेंबर रोजी प्रशासनाने धाडी टाकल्या होत्या.

अवैध बायोडिझलप्रकरणी मलकापुरात गुन्हे दाखल
सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा) : मलकापुरात पाच बायोडिझेल पंपावर ७ सप्टेंबर रोजी महसूल, पुरवठा विभागाने धाडी टाकल्यानंतर पंप सील करण्यात आले आहे. त्यावेळी घेतलेल्या द्रवपदार्थाच्या नमून्यांचे अहवाल प्राप्त झाल्याने याप्रकरणी तक्रारीवरून मध्यप्रदेशातील आरोपी जुनेद खान वहीद खान, बेरजारी ता . महेतपूर, जि. उजैन्न, लखन बद्रीलाल प्रजापती (२२) रा. मन्सोर या दोघांवर गुरूवारी रात्री जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकमतने बायोडिझेलची विक्री होत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत ७ सप्टेंबर रोजी प्रशासनाने धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये दसरखेड, चिखली रणथम या एकाच ठिकाणी दोन टाक्यांमध्ये केमिकलयुक्त बायोडिझेल आढळून आले. काही पंपधारकांनी टाक्यांतील बायोडिझेल काढून टाकले. फक्त दोन टाकीमध्ये केमिकलयुक्त बायोडिझेल सापडले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोडिझेलचे नमुने घेत ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. ही कारवाई पुरवठा अधिकारी स्मिता ढाके व अजाबसिंग राजपूत यांनी केली होती. त्यावेळी तहसीलदार आर.यु.सुरडकर यांनी नमून्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. आता हाँटेल एकता समोरील टिनशेडमध्ये असलेल्या ३ हजार लिटरच्या टाकीतून घेतलेले नमूने सदोष आढळून आले. त्यावरून निरिक्षण अधिकारी स्मीता ढोके यांनी मलकापूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गंत कलम ३,७ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमराज कोळी करीत आहेत.